कोल्हापुर: लपंडाव खेळताना उच्चदाबाच्या वीजवाहिनीचा स्पर्श होऊन ९ वर्षीय चिमुरड्याचा जागीच मृत्यू

कोल्हापुर: कागल तालुक्यातील सुळकूड येथे लपंडाव खेळताना वीजवाहिनीचा धक्का लागून नऊ वर्षीय शार्विल सागर महादेव याचा रविवारी (दि. २) सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्विल हा बीएसएनएल टॉवर परिसरात राहत होता. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास तो गावातील मारुती दत्तात्रेय परीट यांच्या घराच्या टेरेसवर मुलांसोबत लपंडाव खेळत होता. मित्रांना शोधण्यासाठी टेरेसवर जात असताना बाजूने गेलेल्या लो-टेन्शन वीजवाहिनीच्या संपर्कात आला. यावेळी जोरदार विजेचा धक्का बसल्याने तो गंभीर जखमी झाला.


कुटुंबीयांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय, कागल येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शार्विलचे चुलते सुधीर बाबूराव महादेव (वय ३५) यांनी कागल पोलिस ठाण्यात खबर दिली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कागल पोलिस करत आहेत. शार्विलच्या पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे.

वाढदिवसानिमित्त सायकल घेण्याचे स्वप्न अपूर्णच...
दि. १५ ऑगस्ट रोजी शार्विलचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्याला नवीन सायकल घेण्याचे घरच्यांनी ठरवले होते. सायकलच्या आनंदात तो मित्रांच्या सायकली चालवत असे आणि "माझी सायकल वाढदिवसाला येणार, मग मी तुलाही चालवायला देईन," असे मित्रांना सांगत होता. मात्र, नियतीने हा आनंद हिरावून घेतला आणि सायकल घेण्याचे स्वप्न अधुरेच राहिली. ही आठवण सांगताना नातेवाईक आणि मित्रांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *