रायगड: खोपोलीतील वीरेश्वर मंदिर चोरी प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश; पुणे आणि अहिल्यानगरमधून चार जण अटकेत, १७ किलो चांदी चोरीचा गुन्हा उघड!

रायगड: खोपोली शहराचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक आणि पेशवेकालीन श्री वीरेश्वर मंदिरातील धाडसी चोरीचा अवघ्या काही दिवसांतच खोपोली पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे. मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील सुमारे १७ किलो वजनाचे मूल्यवान चांदीचे आच्छादन चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून या चौघांना अटक करण्यात आली असून, या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून पोलिसांच्या कामाचे कौतुक होत आहे.

१८ ते १९ जुलैच्या दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी खोपोलीतील ऐतिहासिक वीरेश्वर मंदिरात प्रवेश करून शिवपिंडीवरील सुमारे १७ किलो वजनाचे चांदीचे आच्छादन लांबवले होते. या अत्यंत गंभीर घटनेमुळे खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील भाविक व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन मंदिर विश्वस्तांशी चर्चा केली होती. तसेच आरोपींचा तातडीने शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नेमण्यात आली होती.

तपासादरम्यान खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, खालापूर आणि रसायनी पोलिसांच्या पथकांनी रात्रंदिवस मेहनत घेत तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, फास्टॅग प्रणाली आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. या कसून तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या वाहनाचा आणि पसार होण्याच्या मार्गाचा शोध लागला. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषğाच्या आधारे पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून दोन, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथून दोन अशा एकूण चार जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल सुरेश कसबे आणि विलास साहेबराव आगीवले (रा. शिरूर, जि. पुणे) तसेच दिलीप राजू जाधव आणि सखाराम छबन गायकवाड (रा. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी खोपोली पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल लवकरच पूर्णपणे हस्तगत केला जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे का, याच्या खोलात जाऊन पोलीस अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *