अमरावती: कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांची अत्यंत निर्घृण हत्या; सरपंचासह ७ जणांना बेड्या, अमरावतीमधील थरारक घटना

अमरावती: एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. कबूतर चोरीच्या वादातून दोन जिवलग मित्रांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला असून, पोलिसांनी याप्रकरणी एका सरपंचासह तब्बल ७ जणांना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?
अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे रविवारी दुहेरी हत्याकांडाची ही घटना घडली. संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित (वय २५) असे प्राणास मुकलेल्या दोन दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. हे दोघे जिवलग मित्र होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कबूतर चोरीवरून काही जणांसोबत त्यांचा वाद झाला होता. हाच राग मनात धरून आरोपींनी या दोन्ही मित्रांवर जीवघेणा हल्ला केला.

वलगाव बसस्टँड परिसरात या दोन्ही तरुणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती वलगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले.

पोलिसांची धडक कारवाई, सरपंचाचाही सहभाग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुरावे आणि गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात एका गावाच्या सरपंचासह एकूण ७ संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. कबूतर चोरीच्या शुल्लक कारणावरून दोन तरुणांचे प्राण घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *