"This is a Criminal, We Are Taking Him to Court": Pune Police’s Strong Message While Parading Murder Accused.

"हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!

"This is a Criminal, We Are Taking Him to Court": Pune Police’s Strong Message While Parading Murder Accused.पुणे: लग्नाच्या वरातीत गाण्यावर नाचताना झालेल्या एका किरकोळ धक्काबुक्कीचा राग मनात धरून तरुण मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. अटक केल्यानंतर पुणेकरांमधील गुन्हेगारांची दहशत कमी करण्यासाठी आणि खाकीचा धाक दाखवण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांनी या फरार आरोपीची भररस्त्यातून धिंड काढली. या धिंडीदरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भररस्त्यात ओरडून, "हा क्रिमिनल आहे, आम्ही त्याची वरात काढतोय. नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही," असे सांगत गुन्हेगारांना जाहीर इशारा दिला. पोलिसांच्या या 'सिंघम' स्टाईल कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
मयत तरुणाचे नाव तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे आहे. काही दिवसांपूर्वी वेल्हा तालुक्यात एका लग्नाची वरात सुरू असताना, गाण्यावर नाचताना तेजसचा धक्का आरोपी विशाल खोपडे याला लागला होता. या अगदी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि प्रकरण हाणामारीवर गेले.
याच भांडणाचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी तेजसचा काटा काढण्याचा थरारक कट रचला.

सर्व्हिस रोडवर गाठून केला खून
२५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास तेजस पिलाने हा पुणे-सातारा हायवेवरील शिवसृष्टी ते कात्रज सर्व्हिस रस्त्यावरून जात असताना, आरोपींनी त्याला रस्त्यात अडवले. पूर्ववैमनस्यातून आरोपींनी धारदार शस्त्राने आणि दगडाने ठेचून तेजसचा अत्यंत निर्घृणपणे खून केला आणि सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

 

फरार आरोपीला 'अशा' ठोकल्या बेड्या
घटनेचे गांभीर्य ओळखून भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुख्य संशयित विशाल खोपडे, अभिषेक खोपडे, सचिन धुळे आणि आदिनाथ कसबे यांना अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील पाचवा आणि महत्त्वाचा आरोपी आदित्य काका गायकवाड हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता.
गुन्हे शाखा आणि भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. दरम्यान, फरार आरोपी आदित्य गायकवाड हा आंबेगाव बुद्रुक परिसरातील लेकटाऊन रोडवर येणार असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

भरचौकात काढली धिंड; पोलिसांचा नागरिकांना शब्द
आरोपीला आंबेगाव बुद्रुक परिसरात आणून पोलिसांनी त्याची जाहीर धिंड काढली. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले, *"हा क्रिमिनल आहे, याने खून केलाय आणि आम्ही याची वरात काढतोय. तुमच्या परिसरात गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. सामान्य नागरिकांनी गुन्हेगारांना मुळीच घाबरण्याची गरज नाही, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत."*

पुण्यात पोलिसांचा नवीन 'खाकी पॅटर्न'
गेल्या काही दिवसांत पुण्यात कोयता गँग आणि इतर सराईत गुन्हेगारांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परिसरात असणारी दहशत एका झटक्यात संपवण्यासाठी आणि नागरिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी हा नवा 'खाकी पॅटर्न' सुरू केला आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आंबेगाव आणि कात्रज परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *