Thane : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, सिमेंट मिक्सरची ईको कारला जोरदार धडक, 11 जणांचा जागीच मृत्यू

Thane : कल्याण–अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हृदयद्रावक अपघात घडला. कल्याणहून मुरबाडकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ईको कारला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात कसा घडला?

प्राथमिक माहितीनुसार, ईको कार कल्याण ते मुरबाड दरम्यान प्रवासी वाहतूक करत होती. दरम्यान, एका पुलावर समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. मात्र, कारचा चक्काचूर झाल्यामुळे अनेक प्रवासी आत अडकले होते.

बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. कटरच्या साहाय्याने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

वाहतूक विस्कळीत

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या भीषण अपघातामुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या अपघातासाठी नेमकी जबाबदारी कोणाची याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *