कोल्हापूर: टेम्पोतून उतरताना बैल उधळला, पकडायला गेले अन् जीवाला मुकले! आजरा तालुक्यात तारेच्या कुंपणाचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू; मायलेकरांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील खानापूर येथे शेताच्या तारेच्या कुंपणास बेकायदेशीररीत्या विद्युत पुरवठा (इलेक्ट्रिक सप्लाय) दिल्याने जोरदार शॉक लागून एका ६४ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भागोजी सदू जाधव (वय ६४, रा. खानापूर, ता. आजरा) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. नव्याने खरेदी केलेला बैल टेम्पोतून उतरवताना अचानक उधळल्याने त्याला पकडण्यासाठी ते शेतात गेले असताना 'आंबेशेत' नावाच्या शेतात हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेत शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी सुषमा सुभाष राणे आणि जितेंद्र सुभाष राणे (दोघेही रा. खानापूर) या मायलेकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भागोजी जाधव यांना शर्यतीचा बैल पाळण्याचा मोठा छंद होता. या छंदापोटी त्यांनी कालच एक नवीन बैल खरेदी केला होता. आज (दि. २१ नोव्हेंबर २०२६) सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास गावात टेम्पोतून हा बैल खाली उतरवला जात असताना अचानक बैल बिथरून टेम्पोतूनच उधळला आणि शेताच्या दिशेने पळू लागला. उधळलेल्या बैलाला पकडण्यासाठी भागोजी जाधव यांच्यासह टेम्पो चालक संभाजी तेजम, ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे आणि मुलगा दिगंबर जाधव हे तातडीने बैलाच्या पाठोपाठ धावले.

दरम्यान, त्या परिसरातील आंबेशेत नावाच्या शेताच्या घरातील विद्युत पुरवठा सुषमा राणे आणि जितेंद्र राणे यांनी शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणाला सोडला होता. बैलाला पकडण्याच्या घाईत असताना भागोजी जाधव यांचा त्या विद्युत प्रवाह असलेल्या तारेच्या कुंपणाला अचानक स्पर्श झाला. जोरदार विजेचा धक्का बसल्याने ते जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

पाठोपाठ आलेले मुलगा दिगंबर जाधव, टेम्पो चालक संभाजी तेजम आणि ग्रामपंचायत शिपाई दत्तात्रय डांगरे यांनी तात्काळ लाकडी काठी व दोरीच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने भागोजी जाधव यांना तारेपासून बाजूला काढले आणि उपचारासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण खानापूर गावावर शोककळा पसरली असून, भागोजी जाधव यांच्यावर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे.

तारेच्या कुंपणाला घरातील विद्युत पुरवठा जोडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा किंवा प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असतानाही सुषमा व जितेंद्र राणे यांनी अत्यंत बेजबाबदारपणे तारेच्या कुंपणाला वीजप्रवाह दिला होता, अशी तक्रार व फिर्याद मृताचे पुत्र दिगंबर जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी सुषमा राणे आणि जितेंद्र राणे या दोघांवर गुन्हा दाखल करून सायंकाळी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हे करीत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *