सांगली: मन हेलावणारी घटना; देशिंग येथे विहिरीत बुडून ऊसतोड मजूर महिला आणि दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

सांगली: जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथील देसाई वस्ती परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत बुडून एका ऊसतोड मजूर महिला आणि तिच्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विजापूरहून आलेल्या ऊसतोड मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत मायलेकांची नावे प्रीती मनोहर राठोड (वय २५) आणि श्रीहंन मनोहर राठोड (वय २) अशी आहेत. प्राप्त माहितीनुसार, प्रीती राठोड या मूळच्या कर्नाटक राज्यातील विजापूर येथील रहिवासी असून, त्या आपल्या कुटुंबासह ऊसतोडणीच्या कामासाठी सांगली जिल्ह्यातील देशिंग येथील देसाई वस्ती परिसरात आल्या होत्या.

नेमकी घटना कशी घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काही कारणावरून आपापसात वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादानंतर प्रीती राठोड आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा श्रीहंन अचानक बेपत्ता झाले. बराच वेळ ते कुठेही न दिखल्याने कुटुंबीयांच्या आणि नातेवाइकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात आणि शेतात दोघांचा शोध सुरू केला, परंतु बराच वेळ शोध घेऊनही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

विहिरीत चप्पल तरंगताना आढळली दरम्यान, रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास स्थानिक शेतकरी नंदकुमार घोरपडे यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीच्या पाण्यावर एका महिलेची चप्पल तरंगताना दिसून आली. चप्पल दिसताच नातेवाइकांना आणि गावकऱ्यांना संशय आला. त्यांनी ताتडीने विहिरीत डोकावून पाहिले असता, महिला आणि तिचे लहान मूल पाण्यात मृत अवस्थेत असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

रेस्क्यू फोर्सद्वारे मृतदेह बाहेर घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण केले. रेस्क्यू फोर्सचे जवान तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विहीर सुमारे ७० फूट खोल असून, त्यात तब्बल ३० फूट पाणी होते. जवानांनी आपल्याजवळील आवश्यक साधनसामग्री आणि विशेष कौशल्याचा वापर करून अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही मृतदेह विहिरीतून यशस्वीरीत्या बाहेर काढले.

कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा पूर्ण केला असून, दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (विच्छेदनासाठी) कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अधिकृत नोंद करण्यात आली असून, मायलेकांच्या या गूढ मृत्यूमागील नेमके कारण काय आहे, याचा कसून तपास पोलीस करत आहेत. या बचावकार्यात स्पेशल रेस्क्यू फोर्सचे वरिष्ठ कमांडर कैलास वडर, कमांडर महेश गव्हाणे, कृष्णा हेगडे, सागर जाधव, इर्शाद कवठेकर, लहू घोरपडे, आकाश घोलप आणि अमीर नदाफ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *