मुंबई: लोकलच्या छतावर झोपला माणूस; आपत्कालीन साखळी ओढल्याने लोकल खोळंबली, प्रवाशांना मनःस्ताप!

मुंबई: मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालत्या लोकल ट्रेनच्या छतावर एक अनोळखी व्यक्ती झोपल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. यानंतर सतर्क प्रवाशाने त्वरित आपत्कालीन साखळी (चेन पुलिंग) ओढल्यामुळे लोकलचा प्रवास काही काळ रखडला आणि मोठा अनर्थ टळला.

रविवारी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून आसनगावच्या दिशेने जाणारी लोकल टिटवाळा रेल्वे स्थानकात पोहोचली होती. त्याच वेळी एका प्रवाशाचे लक्ष लोकलच्या छतावर असलेल्या एका अनोळखी व्यक्तीकडे गेले. हा अत्यंत धोकादायक प्रकार पाहताच प्रवाशाने सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आपत्कालीन साखळी ओढली, ज्यामुळे ट्रेन जागीच थांबली.

विद्युतपुरवठा बंद करण्यात आला

लोकलच्या छतावर चढलेल्या त्या व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तातडीने पावले उचलावी लागली. रात्री ८ वाजून २६ मिनिटांनी ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) मधील उच्च दाबाचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि स्थानक व्यवस्थापकांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला अत्यंत खबरदारी घेऊन सुरक्षितपणे खाली उतरवले. सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर रात्री ८ वाजून ३४ मिनिटांनी लोकल पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

या अनपेक्षित घटनेमुळे सुमारे १५ मिनिटे लोकल सेवा खोळंबली. रात्रीच्या वेळी लोकल रखडल्यामुळे घरी परतणाऱ्या प्रवाशांना स्थानकात आणि डब्यांमध्ये नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागला.

धोकादायक कृत्याचे कारण अद्याप अस्पष्ट

सदर अनोळखी व्यक्तीने अशा प्रकारे जीव धोक्यात घालून लोकलच्या छтаवर चढण्याचे धाडस का केले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे मार्गावरील उच्च दाबाच्या विद्युत तारांचा जीवघेणा धोका पाहता, या प्रकारामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाकडून (RPF) कसून तपास सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *