मुंबई: पोलिसांची धडक कारवाई! कांदिवलीतील कुख्यात 'टिपू टोळी'वर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई, १७ गुन्हे दाखल असलेले मुख्य म्होरक्यासह तिघे जण जेरबंद

मुंबई: कांदिवली आणि समतानगर परिसरात दहशत माजविणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगारी टोळीविरोधात मुंबई पोलिसांनी अत्यंत धडक कारवाई केली आहे. समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनमोल डेअरी आणि रेस्टॉरंट परिसरात नागरिकांना मारहाण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि अमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार इम्तियाज हुसैन सैयद उर्फ 'टिपू' आणि त्याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघा जणांना बेड्या ठोकल्या असून, टोळीच्या म्होरक्यासह इतर सदस्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

प्राप्त सविस्तर माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी कांदिवली पूर्वेकडील हनुमान नगर येथील महाराष्ट्र बिरयानी सेंटर आणि अनमोल डेअरी परिसरात एका जुन्या वादातून गंभीर प्रकार घडला होता. कुख्यात गुन्हेगार टिपू आणि त्याच्या साथीदारांनी मिळून तक्रारदार आणि त्याच्या मित्रांना अचानक घेरले. आरोपींनी हातामध्ये धारदार चाकूचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण केली आणि हातातील दगड व लाकडी दांड्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या प्राणघातक हल्ल्यात काही तरुण गंभीर जखमी झाले होते. आरोपींनी या हल्ल्यादरम्यान त्यांची हत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप गुन्ह्यात ठेवण्यात आला आहे.

 

 

या घटनेनंतर तात्काळ समतानगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले की, हा सवयीचा गुन्हेगार इम्तियाज हुसैन सैयद उर्फ 'टिपू' याने एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. समतानगर आणि कुरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने आपले बस्तान बसवून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली होती. या टोळीच्या प्रचंड मुजोरीमुळे आणि भीतीमुळे सामान्य नागरिक यांच्याविरुद्ध उघडपणे तक्रार करण्यासही धजावत नव्हते. या संघटित टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची अवैध विक्री (Drugs Peddling) करून आर्थिक फायदा मिळविला जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या रेकॉर्ड तपासात समोर आले की, मुख्य आरोपी टिपूविरुद्ध यापूर्वीच तब्बल १७ गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत. तसेच त्याच्या टोळीतील इतर सदस्यांचाही मोठा गुन्हेगारी इतिहास आहे. राज रवि शर्मा याच्याविरुद्ध सात गुन्हे, तर जितेश राजपूत, केतन पांडुरंग गमरे आणि राधा राजपूत यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत. या संघटित टोळीमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे तपासात आढळले असून त्याच्याविरुद्धही दोन गुन्ह्यांची नोंद आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यात 'मकोका' (MCOCA) कायद्यातील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्यात आला. समतानगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे मुंबईतील गुन्हेगारी वर्तुळात आणि टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *