मुंबई: राज ठाकरे कोण आहेत, भाजप गप्प का? मुंबईतील छठ पूजेच्या विरोधावरून लालूंच्या कन्या रोहिणी आचार्यांचा तीव्र संताप

मुंबई: आयोजित करण्यात येणाऱ्या छठ पूजेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया देत राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी त्यांच्यावर अतिशय कडक शब्दांत हल्लाबोल केला आहे. रोहिणी आचार्य यांनी राज ठाकरेंची तुलना थेट पावसाळ्यातील बेडकांशी केली असून, ते केवळ प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असल्याचा आरोप केला आहे.

'छठ जवळ आला की काही लोक प्रसिद्धीसाठी बाहेर येतात' रोहिणी आचार्य यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटले की, "ज्याप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर बेडूक बाहेर येतात, अगदी त्याचप्रमाणे दरवर्षी छठ महापर्व जवळ येऊ लागला की काही लोक केवळ चर्चेत राहण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी बाहेर येतात." राज ठाकरे नेमके कोण आहेत? असा सवाल करत त्यांनी, हे लोक नेहमीच बिहारची संस्कृती, लोकआस्था आणि इथल्या लोकांच्या श्रद्धेला कमी लेखण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रयत्न करत असतात, असे म्हटले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "छठी मातेने राज ठाकरेंना सद्बुद्धी द्यावी आणि त्यांच्या मनातील उत्तर भारतीय लोकांबद्दलचा द्वेष दूर करावा."

नेमका वाद काय आहे? मुंबईत सार्वजनिक ठिकाणी आणि किनारी भागांवर होणाऱ्या छठ पूजेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. मनसेने बाणगंगा टैंक आणि गिरगाव चौपाटीसह विविध महत्त्वाच्या ठिकाणी छठ पूजेवर आणि पूजा सामग्रीच्या विसर्जनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पूजेमुळे होणारा कचरा आणि पर्यावरणाची होणारी हानी या मुद्द्यांवर मनसे आक्रमक झाली आहे. याशिवाय, राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत छठ पूजेच्या रील्स आणि व्हिडिओंना 'सांस्कृतिक आक्रमण' असे म्हटले होते. तसेच मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवण्यात आलेल्या भोजपुरी गाण्यांच्या मुद्यावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला होता, ज्यावरून आता जोरदार राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपच्या भूमिकेवर रोहिणी आचार्यांचे सवाल या संपूर्ण वादात रोहिणी आचार्य यांनी भारतीय जनता पक्षालाही (BJP) धारेवर धरले आहे. त्यांनी थेट सवाल केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे सर्व मोठे नेते छठ पर्वाच्या वेळी आवर्जून देशवासीयांना आणि उत्तर भारतीय नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात, मग आता अशा गंभीर वेळी भाजपचे नेते गप्प का आहेत? भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच महाराष्ट्रात आणि मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीय व बिहारी नागरिकांना कोणतीही भीती न बाळगता आपला हा पवित्र सण पूर्ण उत्साहात व स्वातंत्र्यासाजरा करण्याचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे, असे त्या ठामपणे म्हणाल्या.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *