पुणे: महापालिकेने नवले पुलाचा हरितपट्टा स्वच्छ करत लावली ५० नवीन झाडे; 'नो गार्बेज झोन'चे नियोजन

पुणे: मुंबई-पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज ते भुमकर चौकादरम्यानच्या हरितपट्ट्यात साचलेल्या कचऱ्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. या समस्येबाबत 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने परिसरातील कचरा उचलून स्वच्छता केली. तसेच, पहिल्या टप्प्यात ५० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. मात्र, स्वच्छतेनंतरही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने केलेली स्वच्छता आणि वृक्षारोपण टिकविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

वृक्षारोपणानंतरही पुन्हा कचरा
स्वच्छतेनंतर महापालिकेने या हरितपट्ट्यात पहिल्या टप्प्यात ५० झाडे लावली आहेत. मात्र, काही चहा-नाश्त्याच्या टपऱ्या, फळविक्रेते आणि नागरिकांकडून पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता आहे. वृक्षारोपण आणि स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न टिकवायचे असतील, तर कचरा टाकणाऱ्यांवर नियमित देखरेख आणि दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

"चहा-नाश्त्याचे व्यावसायिक आणि फळविक्रेते यांच्याकडून परिसरात कचरा टाकला जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधितांची ओळख पटवून दंडात्मक कारवाई केल्यास पुन्हा कचरा टाकण्यास आळा बसेल. अनुया जोशी, नन्हेगाव
"प्रशासनाने परिसर स्वच्छ केल्यानंतर तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. केवळ प्रशासनाकडून अपेक्षा न ठेवता नागरिकांनीही परिसरात कचरा टाकणे टाळले पाहिजे. डॉ. सुनील आंबेगावकर


प्रशासनाची भूमिका
पहिल्या टप्प्यात ५० झाडे लावण्यात आली आहेत. पुढील टप्प्यात आणखी वृक्षारोपण करून हा परिसर 'नो गार्बेज झोन' म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करावे. प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त, मनपा"

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *