दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन

दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या भव्य रॅली व आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असतानाच, आता दिल्लीतील व्यापारी वर्गाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सणासुदीचा व दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा काळ सुरू असताना होणाऱ्या या आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयांचे मोठे व्यापारी नुकसान होऊ शकते, असे स्पष्ट करत दिल्लीतील व्यापारी संघटनांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहून या आंदोलनाची तारीख बदलण्याचे किंवा त्यावर फेरविचार करण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

दिल्लीस्थित व्यापारी संघटना असलेल्या 'चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री' (सीटीआय) कडून राहुल गांधी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, आम्हाला कोणताही संघर्ष किंवा लढाई नको आहे, तर केवळ संवाद हवा आहे. राहुल गांधी हे नेहमीच असे म्हणतात की ते सर्वांचे ऐकतात आणि सामान्य तथा लहान व्यापाऱ्यांचा आवाज सुद्धा गांभीर्याने ऐकून घेतात. त्यामुळे दिल्लीतील २० प्रमुख घाऊक बाजारपेठांमधील २० व्यावसायिक प्रतिनिधींना राहुल गांधींसोबत फक्त २० मिनिटांची भेट घेण्यासाठी वेळ द्यावा, जेणेकरून या समfस्येवर सकारात्मक चर्चा होऊ शकेल. लोकशाहीची हीच खरी सुंदरता असल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी आम्हाला संवाद हवा आहे, असे म्हटले आहे.

आगामी १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या या महामोर्चा किंवा रॅलीमध्ये सुमारे १० लाख लोकांची गर्दी जमवण्याचा दावा केला जात आहे. मात्र, या प्रचंड गर्दीमुळे आणि आंदोलनामुळे रामलीला मैदानालगतच्या जवळपास २० प्रमुख व्यावसायिक बाजारपेठा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. यामध्ये नय्या सरक, किनारी बाजार, दरीबा कलान, फतेहपुरी, नया बाजार, फिल्मीस्तान, पहाडगंज, गफ्फार मार्केट, जामा मशिद-मीना बाजार आणि लाजपत राय मार्केट यांसारख्या दिल्लीच्या सर्वात मोठ्या घाऊक बाजारपेठांचा समावेश आहे.

धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीज या सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते आणि हा काळ व्यापाऱ्यांच्या वर्षभराच्या उलाढालीचा सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. जर या काळात अशा प्रकारची मोठी आंदोलने झाली, तर जुन्या दिल्लीसह संपूर्ण परिसरातील व्यावसायिक व्यवहार पूर्णपणे कोलमडतील आणि व्यापाऱ्यांचे तब्बल १० हजार कोटी रुपयांपर्यंतचे अवाढव्य आर्थिक नुकसान होऊ शकते, अशी भीती सीटीआयने व्यक्त केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या ऐन सणात व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय येऊ नये आणि त्यांच्या कमाईवर पाणी फेरले जाऊ नये, यासाठी राहुल गांधींनी या आंदोलनाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी आर्त हाक व्यापाऱ्यांनी दिली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *