रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!

रायगड: खारघर येथील बेलपाडा आदिवासीवाडीत राहणारे बाळू दत्ता कांबडे (वय 61) यांचा सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी दुपारी 12 वाजता बेलपाडा आदिवासीवाडीत कारवाईसाठी आले होते. यावेळी आदिवासीवाडीतील एक झोपडी तोडण्यात आली. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आदिवासी बांधवांनी या कारवाईला विरोध केला. दरम्यान, बाळू दत्ता कांबडे हे त्याच ठिकाणी असलेल्या आपल्या दुसऱ्या झोपडीत गेले असता तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमच्याकडे घरपट्टी असल्याचे या आदिवासी बांधवांचे म्हणणे होते, मात्र सिडको प्रशासन कारवाईवर ठाम होते.

या संपूर्ण तणावाच्या आणि धक्क्याच्या वातावरणात, बाळू दत्ता कांबडे हे तणावाखाली तेथेच असलेल्या आपल्या दुसऱ्या झोपडीमध्ये गेले. परंतु, या कारवाईच्या तीव्र मानसिक धसक्यामुळे आणि भीतीमुळे त्यांची तब्येत बिघडली आणि त्याच ठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशासनाच्या या कारवाईमुळेच आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप मृत बाळू कांबडे यांचे पुत्र दत्ता कांबडे आणि इतर नातेवाईकांनी केला आहे.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जोपर्यंत संबंधित दोषी सिडको अधिकाऱ्यांवर 'ॲट्रॉसिटी ॲक्ट' (Atrocity Act) नुसार कठोर गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी अत्यंत ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या मृत बाळू कांबडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, या प्रकरणी परिसरात मोठा तणाव पाहायला मिळत आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *