सोलापूर: पंढरपुरातील २४ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण; विहिरीत मातीखाली अडकलेल्या चारही कामगारांचे मृतदेह बाहेर काढले

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले असून चारही कामगारांचे मृतदेह काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणांकडून शोधकार्याचा सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.

आंबे येथे विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली अडकले होते. एकाचा मृतदेह रविवारी रात्री १०.३० वाजता सापडला. त्यानंतर दुसरा मृतदेह आज सोमवारी पहाटे चार वाजता, तिसरा मृतदेह सोमवारी सकाळी ८.३० वाजता तर चौथा मृतदेह सोमवारी सकाळी ११ वाजता सापडला. या दुर्घटनेत मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, तानाजी घोडके, आबा घोडके हे चार लोकांचा मृत्यू झाला आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेअन यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर उपस्थित आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *