डॉ. अनिल जोशी यांचा कॉलम:केदारनाथपासून नेपाळपर्यंत सतत मिळू लागले इशारे

एक गोष्ट स्पष्ट आहे, आपण हिमालयाबद्दल अजिबात गंभीर नाही. हे आजचे नाही, तर गेल्या दोन दशकांपासून हिमालयात घडणाऱ्या घटना याच गोष्टीकडे इशारा करत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या घटनांसाठी हिमालय किंवा तिथल्या लोकांना दोषी धरता येणार नाही. यासाठी दोषी भलतेच कुणीतरी आहेत. स्थानिक रहिवाशी तर इतरांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत. नेपाळमधील काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेनंतर संपूर्ण हिमालयात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे. कारण यापूर्वीच्या दुर्घटनाही कोणतीही पूर्वसूचना देऊन आलेल्या नव्हत्या. नेपाळच्या भोटेकोशी नदीपासून ते बिहारच्या कोशी नदीपर्यंत पुराच्या हाहाकारची दृश्ये समोर आली आहेत. नेपाळमधील या दुर्घटनेचा संबंध भूकंपाशीही जोडला जात आहे. पण हिमनद्यांवर भूकंपाचा तितकासा परिणाम होत नाही. वाढत्या तापमानामुळेच हे बर्फाचे डोंगर कमकुवत झाले असावेत आणि ही दुर्घटना घडली असावी. हिमालय किंवा सीमेला लागून असलेले भाग संवेदनशील आहेत, हे लक्षात घेऊन आपण त्यांची राज्ये किंवा देशांमध्ये पुनर्रचना जरूर केली. येथील पर्यावरणाचा विचार कधी केलाच गेला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, येथील पर्यावरण समजून घेणे म्हणजे केवळ त्याची संवेदनशीलता समजणे नव्हे. जगभरात होणाऱ्या बदलांचा हिमालयावर काय परिणाम होईल, हे समजण्यात आपण पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. जगभरात कार्बन उत्सर्जनाची कारणे काहीही असोत- मग त्या आपल्या जीवनशैलीतील सुविधा असोत, चैनीच्या गोष्टी असोत किंवा विकासाचा आराखडा असो. गेल्या 200 वर्षांत झालेल्या कार्बन उत्सर्जनामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. थोडक्यात सांगायचे तर, हिमालय हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथील निसर्ग आणि पर्यावरण अतिशय नाजूक आहे. त्यात थोडी छेडछाड केली, तरी त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. कदाचित आपली धोरणे ठरवताना या गोष्टीचा विसर पडला आहे. नेपाळपूर्वी केदारनाथ, सिक्कीम आणि धराली येथे झालेल्या दुर्घटनाही अशाच प्रकारच्या होत्या. नेपाळमध्ये हिमनदी फुटल्यामुळे ही मोठी दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. हिमालयातून निघणाऱ्या सर्व नद्यांना प्रचंड पूर आला आणि काठावरची गावे अन् शहरे वाहून गेली. अशा संकटात पाण्यासोबत प्रचंड प्रमाणात दगड-मातीचा चिखल वाहत येतो. हा चिखल घरे तर उद्ध्वस्त करतोच, शिवाय लोकांनाही वाहून नेतो किंवा गाडतो. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यासाठी मोठा वेळ लागतो. नेपाळमधील अनेक धरणेही या पुराच्या तडाख्यात सापडली आहेत. विकासाचा संपूर्ण पायाच नष्ट झाला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे; कार्बन उत्सर्जन संतुलित होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. याचा सरळ अर्थ असा की, हे उत्सर्जन आपल्यासाठी एक मोठे संकट बनले आहे. यामुळेच तापमान आपल्या नियंत्रणाबाहेर जात आहे आणि त्याचा थेट परिणाम समुद्रांवर होत आहे. समुद्र हे आपल्या पृथ्वीचे हवामान आणि पर्यावरण नियंत्रित करणारे मुख्य घटक आहेत. समुद्रात होणारा कोणताही बदल संपूर्ण पृथ्वीवर परिणाम करतो. याचाच परिणाम म्हणून आपण मोसमी पावसाचे नैसर्गिक चक्र गमावून बसलो आहोत. कधी आणि कुठे अचानक ढगफुटी होईल, याचा काहीही अंदाज लावता येत नाही. हवामान खातेही अनेकदा चक्रावून जाते, कारण निसर्गाचा संपूर्ण समतोल ढासळला आहे. अशा वेळी या दुर्घटनेकडे केवळ काही हजार लोकांचे नुकसान म्हणून पाहू नये. तर ही येणाऱ्या काळात करोडो लोकांसाठी येणाऱ्या मोठ्या संकटाचा इशारा आहे. हे सर्व घडले. कारण जगातील मोठा भाग स्वतःच्या विकास व सुविधांमध्ये व्यस्त आहे. तर त्याचा भुर्दंड या नाजूक पर्यावरणात राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे. आपण हे कटू सत्य स्वीकारणार नाही, तोपर्यंत हिमालयास न्याय देऊ शकणार नाही. नेपाळची दुर्घटना , त्याआधीच्या घटना हाच धडा देतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) हिमालय हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. येथील पर्यावरण नाजूक आहे. थोड्याही हस्तक्षेपाने गंभीर परिणाम समोर येतात. दुर्दैवाने आपल्या धोरणांमध्ये ही जाणीव अजूनही दिसलेली नाही. आधी केदारनाथ, सिक्कीम, धरालीमध्येही अशा भयंकर दुर्घटना घडल्या आहेत.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *