मुंबई-गोवा महामार्गावर तुफान महाकोंडी: गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे पळस्पे, इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहनांच्या ८ ते १० किलोमीटर लांबच लांब रांगा!

गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरासह विविध भागांतून लाखो गणेशभक्त आणि चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर रवाना झाले आहेत. मात्र, या आनंदाच्या प्रवासात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आणि गणेशभक्तांच्या मार्गात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत असून, विशेषतः पळस्पे फाटा, इंदापूर आणि माणगाव या प्रमुख परिसरांमध्ये तब्बल ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना तासन्तास वाहतूक कोंडीत रखडावे लागत असून प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गणेशोत्सवाच्या या अफाट गर्दीमुळे आणि महामार्गावर वाहनांची संख्या अचानक कैक पटीने वाढल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा वेग अत्यंत मंदावला आहे. माणगाव आणि इंदापूर या परिसरांमध्ये महामार्गाचे चौपदरीकरण आणि बाह्यवळण (बायपास) रस्त्यांची रखडलेली कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. यामुळे या भागांत वाहनांना जुन्याच अरुंद रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यातच हे मार्ग थेट शहरांच्या मध्यवर्ती बाजारपेठेतून जात असल्यामुळे वाहनांची प्रचंड गती मंदावते आणि एकेरी वाहतूक सुरू ठेवावी लागत असल्याने वाहनांच्या रांगाच्या रांगा तयार होत आहेत. पाच ते सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी सध्या वाहनचालकांना पाऊण ते एक तास इतका विलंब लागत आहे. याशिवाय वाकण, पाली, निजामपूर आणि श्रीवर्धन, म्हसळा या भागांतून येणारे मार्ग याच मुख्य ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गाला मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहनांचे क्रॉसिंग होते आणि कोंडीत भर पडते.

पळस्पे फाट्याविषयी बोलायचे झाल्यास, मुंबई-गोवा महामार्ग आणि जेएनपीटी (JNPT) कडून पुण्याच्या दिशेने जाणारे मार्ग याठिकाणी एकत्र येतात. बंदरातून येणारी अवजड वाहतूक मोठ्या संख्येने या परिसरात येते. प्रशासनाने जरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमता असलेल्या सर्व अवजड वाहनांवर टप्प्याटप्प्याने पूर्ण बंदीचे आदेश दिले असले, तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी अजूनही काही ट्रक आणि केमिकल टँकर रस्त्यांवर किंवा सर्व्हिस रोडवर उभे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वाहतूक नियमन अधिक कठीण बनले आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे वाहतुकीची समस्या आणखीनच गंभीर झाली आहे.

दरम्यान, महामार्गावर निर्माण झालेली ही कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन तसेच वाहतूक विभातर्फे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणेकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसशिने प्रयत्न सुरू आहेत. रायगड पोलिसांनी महामार्गावरील काही ठराविक पट्ट्यांमध्ये वाहनांना थांबण्यास तसेच पार्किंग करण्यास सक्त मनाई केली आहे. असे असले तरी, आगामी दोन दिवसांत कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात असल्याने, आगामी काळात वाहतूक यंत्रणेसमोर मोठे आव्हान असणार आहे. प्रवाशांनी प्रवासादरम्यान वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *