मुंबई: महायुतीत मोठे वादंग! भ्रष्टाचाराचा आरोप करत मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, मिरा-भाईंदरमध्ये राजकीय संघर्ष पेटला

मुंबई: मिरा-भाईंदर शहरात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, शिंदेसेनेचे नेते तथा राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली आहेत. या आंदोलनामुळे ठाणे आणि मिरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिरा-भाईंदर शहराला अशांत करण्याचा प्रयत्न मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपचे स्थानिक प्रतिनिधी आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात सरनाईक सातत्याने विधाने करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान मंत्री सरनाईक यांच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. पत्रकारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरनाईक राजकारण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आमच्या लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला मालिन्य करण्याचा प्रयत्न केल्यास भाजपही त्यांना जशास तसे आणि ठोस प्रत्युत्तर देईल, असा थेट इशारा यावेळी भाजप जिल्हाध्यक्षांनी दिला आहे.

दरम्यान, मंत्री प्रताप सरनाईक हे भाजपचा भ्रष्टाचार उघड करत असल्यामुळेच बिथरले आहेत, असा दावा भाजपकडून केला जात आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीमधील समीकरणांवर बोलताना भाजप नेत्यांनी सांगितले की, जरी राज्यात आपण सर्वजण युती म्हणून एकत्र लढलो असलो, तरी मिरा-भाईंदरमध्ये आम्हाला या लोकांसोबत निवडणूक लढवायची नव्हती. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवत ९५ पैकी तब्बल ७८ जागांवर दणदणीत विजय मिळवला, तर शिंदेंच्या पक्षाला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले. या पराभवाच्या आणि प्रचंड यशाच्या पोटदुुखीमुळेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

दुसरीकडे, या आंदोलनादरम्यान शिंदेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील विरोध दर्शवण्यासाठी घटनास्थळी येऊन आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याच आरशात आम्ही सरनाईकांच्या भ्रष्ट कारभाराचा आरसा दाखवण्याचे काम केले आहे, असे प्रत्युत्तर भाजप कार्यकर्त्यांनी दिले. मिरा-भाईंदर शहराचे वातावरण शांत राहू द्यावे, असे आवाहन करतानाच दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपामुळे महायुतीमधील आगामी राजकीय वाटचाल अधिक गुंतागुंतीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *