मुंबई: सणासुदीच्या तोंडावर मोठी कारवाई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडून तब्बल ९ कोटी रुपयांचा खाद्य साठा जप्त; पतंजली तुपासह १९ जणांचे परवाने निलंबित

मुंबई: सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर व अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या व्यावसायिकांवर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान राज्यभरातून सुमारे ९ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा संशयास्पद आणि अमानक खाद्यसाठा जप्त करण्यात आला असून, गंभीर स्वरूपाचे नियम उल्लंघन आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या अस्वच्छतेमुळे एकूण १९ खाद्य व्यवसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दिवाळी आणि सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारात मिठाई, खवा, गोड पदार्थ, तूप आणि खाद्यतेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घटकांवर आळा घालण्यासाठी एफडीएने राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत राज्यातील ७ विभागांमधील तब्बल ११४ व्यावसायिक आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या व्यापक कारवाईत सुमारे ३.५३ लाख किलो वजनाचा आणि ९ कोटी १ लाख रुपयांचा खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका मोठ्या सुपर डिस्टिब्युटरकडून मोठ्या प्रमाणावर 'पतंजली'चे गायीचे तूप देखील जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ (FSSAI) च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर परिसरातील अनेक नमकीन, मिठाई आणि मसाले तयार करणाऱ्या युनिट्समध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरण आढळले. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स राखण्यात कसूर केल्याप्रकरणी तेथील १९ परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले. याशिवाय, सातारा येथील 'अमीन ट्रेडर्स'मधून २० हजार ५६० किलो तांदूळ, डाळी आणि गूळ जप्त करण्यात आला आहे, तर पुणे विभागातील साताऱ्यातील 'स्वाती ऑइल मिल्स' आणि सोलापूरमधील 'एस. जी. ट्रेडर्स' येथून खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.

या मोहिमेदरम्यान केवळ जप्तीच नव्हे, तर २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान अन्न सुरक्षा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या १७ आस्थापनांमधून ७९.४० लाख रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकूण १३ गुन्हे (FIR) दाखल करून १६ जणांना अटक करण्यात आली आहे, ७ आस्थापने सील करण्यात आली असून ६ वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. तसेच विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांची कसून तपासणी करून २९ सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अन्नधान्य व फराळाच्या पदार्थांत भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *