पुणे: रावेतमध्ये २९ वर्षीय महिला डॉक्टरने २४ व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं आयुष्य.

पुणे: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत येणाऱ्या रावेत परिसरातून एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. थेरगाव येथील एका नामांकित खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २९ वर्षीय महिला डॉक्टरने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. डॉ. श्वेता तुळशीराम रोकडे असे या दुर्दैवी महिला डॉक्टरचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. श्वेता रोकडे रावेत येथील 'सेलेस्टीयल सिटी' सोसायटीमध्ये आपल्या मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होत्या. शुक्रवारी, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घराच्या जवळच असलेल्या 'ऑस्ट्रिया रॉयल्स' या २४ मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर त्या गेल्या होत्या. काही कळायच्या आतच त्या २४ व्या मजल्यावरून खाली कोसळल्या.

हा भीषण आवाज ऐकून स्थानिक सुरक्षारक्षक आणि कामगारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, डॉ. श्वेता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यांना तातडीने औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रावेत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात त्या इमारतीवर गेल्याची नोंद सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येमागे मानसिक तणाव, कामाचा व्याप की अन्य काही वैयक्तिक कारणे आहेत, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि रावेत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *