दुष्काळाच्या तीव्र झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल, जनावरे विकण्याची आली वेळ

अकोला: अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच आता मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. या तीव्र दुष्काळामुळे शेती तर पूर्णपणे धोक्यात आलीच आहे, परंतु आता ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या 'दुग्ध व्यवसायावर' देखील मोठे संकटाचे सावट निर्माण झाले आहे. अकोला जवळील लोणी गावातील पशुपालक आणि शेतकरी पाण्याच्या व चाऱ्याच्या विवंचनेमुळे अत्यंत हवालदिल झाले असून, हताश होऊन आपल्या हाताने सांभाळलेली लाखमोलाची जनावरे (म्हशी) बाजारात विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अकोला जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे जलस्त्रोत आटले आहेत, विहिरी आणि बोअरवेल कोरड्याठाक पडल्या आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असतानाच, जनावरांना पाजण्यासाठी पाणी आणायचे कुठे आणि त्यांना खायला चारा कसा उपलब्ध करायचा, असा यक्षप्रश्न लोणी गावातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. बाजारात चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत आणि दूरवर जाऊन टँकर किंवा इतर स्रोतांद्वारे जनावरांसाठी पाणी आणावे लागत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी 'काळीज' विकावे लागण्याची वेळ:

वर्षानुवर्षे दुग्ध व्यवसायाला मुलासारखे जपणाऱ्या आणि कुटुंबाचा मुख्य आर्थिक आधार असलेल्या म्हशींना व जनावरांना खाऊ घालायला चारा आणि पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले प्राणप्रिय पशुधन नाईिलाजाने कमी किंमतीत बाजारात विकावे लागत आहे. ग्रामीण भाषेत सांगायचे तर, जनावरे म्हणजे शेतकऱ्याचे काळीज असते, मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी आणि पाहुण्यासारख्या सांभाळलेल्या म्हशी डोळ्यांसमोर कत्तलखाण्यात किंवा इतर व्यापाऱ्यांना विकाव्या लागण्याच्या दुर्दैवी परिस्थितीमुळे शेतकरी वर्गातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.

स्थानिक प्रशासनाने आणि शासनाने या गंभीर दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेऊन लोणी गावासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याची शाश्वत व्यवस्था करावी, अशी आर्त हाक हवालदिल झालेला शेतकरी वर्ग देत आहे. अन्यथा, ग्रामीण भागातील हा पारंपरिक दुग्ध व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *