नाशिक टीसीएस प्रकरण; निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही दिलासा, ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर.

नाशिक शहर आणि राज्यभरात खळबळ उडवून दिलेल्या टीसीएस (TCS) कंपनीतील धर्मांतर तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. या बहुचर्चित प्रकरणातील संशयित निदा खान हिला मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. व्ही. खारकर यांनी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण? नाशिकमधील नामांकित टीसीएस कंपनीशी संबंधित असलेल्या बीपीओ युनिटमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने तिच्यावर झालेला अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात आणि त्यानंतर मुंबई नाका पोलिस ठाण्यातही वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये सुरुवातीला फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी मोठ्या शोधमोहिमेनंतर छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. ती काही काळ न्यायालयीन कोठडीतही होती.

याआधी तिला मूळ प्रकरणात जामीन मंजूर झाला होता, आणि आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातही तिला न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तिला मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. मात्र, कोर्टाने तिला काही अटी व शर्ती घातल्या असून तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील कायदेशीर लढा अद्याप सुरूच असून यावर संपूर्ण प्रशासनाचे आणि नागरिकांचे लक्ष लागून आहे.

 



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *