यवतमाळ: अनैतिक संबंधांना विरोध केल्याप्रकरणी हिंगोलीच्या तरुणाची निर्घृण हत्या.

यवतमाळ: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने ३५ वर्षीय दबंग तरुणाची सहा लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिंगोलीतील एका व्यक्तीने सुपारी दिली, तर मानोरा, दिग्रस आणि दारव्हा परिसरातील आठ जणांनी संगनमत करून ही हत्या केली. दारू पाजून दुचाकीवरून पुसद परिसरातील सत्तरमाळ जंगलात नेल्यानंतर तरुणाचा गळा चिरून त्याला ठार करण्यात आले. हे प्रकरण ४ ऑगस्ट रोजी उघड झाले. खंडाळा पोलिसांना अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. नंतर परिस्थितीजन्य पुराव्यावरून एलसीबी पथकाने हत्याकांडाचा उलगडा केला.


मंगेश उर्फ काल्या अर्जुन मनवर (३५, रा. सिद्धार्थनगर, हिंगोली) असे मृताचे नाव आहे. याच परिसरात राहणाऱ्या अजय भालेराव याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र, यात काल्या अडसर ठरत होता. सोबत त्याच्या दादागिरीच्या प्रवृत्तीने परिसरातील नागरिक दहशतीत होते. हीच संधी साधून अजय भालेराव व त्याची बहीण राधा यांनी बाबू शेख (सर्व रा. हिंगोली) याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर राठोड याच्यासोबत संपर्क केला. ज्ञानेश्वरने ६ लाख रुपयांत काल्याची हत्या करण्याचा कट रचला.

यात राहुल उर्फ महाराज मुकुंदा लोखंडे, श्रावण तुकाराम भवाळ, अशोक अर्जुन शेळके (तिघेही रा. वसंतनगर, उमरी, ता. मानोरा), सोमनाथ संगीत हजारे, विशाल अर्जुन राठोड (दोघेही रा. शेंदोना, ता. मानोरा), दीपक लक्ष्मण जाधव (रा. मांगकिन्ही, ता. दारव्हा), शुक्रधन उर्फ सिद्धार्थ संतोष जाधव (रा. गंगानगर, दिग्रस) यांना सहभागी करून घेतले. सुरुवातीला काल्यासोबत ओळख वाढवून त्याची कमजोरी हेरली. काल्याला दारूचे व्यसन असल्याने लक्षात येताच त्याला दारू पाजली. दारूची नशा अधिक झाल्यानंतर झिंगलेल्या अवस्थेत काल्याला दुचाकीवरून घटनेच्या दिवशी २ ऑगस्ट रोजी खंडाळा परिसरातील सत्तरमाळ जंगलात नेले गेले. तेथे त्याची हत्या करून मृतदेह फेकून देण्यात आला.


गुराखी ४ ऑगस्ट रोजी सत्तरमाळ जंगल परिसरात गेला असता, त्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. नंतर संपूर्ण घटनाक्रमच हाती लागला. सर्वप्रथम सुपारी घेणाऱ्या ज्ञानेश्वर राठोड याला अटक केली. त्याने कबुली दिल्यानंतर सर्व आरोपींना अटक केली.


या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अतिरिक्त अधीक्षक अशोक थोरात, एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धीरज बांडे, विनित घागे, उपनिरीक्षक अमोल राठोड, मुन्ना आडे, संतोष भोरगे, राहुल गोरे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडेकार, रमेश राठोड, दिगांबर पिलावन, महेश वाकोडे, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, राजेश जाधव यांनी केला.



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *