मुंबई: काँग्रेस पक्षाला सुनेत्रा पवारांबद्दल आदरच, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवावे की त्या 'गुंगी गुडीया' नाहीत; विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा गदारोळ उडाला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात वापरण्यात आलेल्या 'गुंगी गुडीया' (Mute Doll) या शब्दप्रयोगानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) यावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध दर्शवला आहे. या संपूर्ण वादावर आणि राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे.

'गुंगी गुडीया' शब्दावर एवढा संताप कशाला? - विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर धडक देऊन या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "एखाद्या राजकीय नेत्यावर किंवा पदाधिकाऱ्यावर टीका केली असता 'गुंगी गुडीया' हा शब्दप्रयोग केला म्हणून एवढा संताप कशाला करायला हवा? लोकशाहीमध्ये विरोधकांनी टीका केली की त्यावर सत्तेचा आणि बळाचा धाक दाखवण्याची भाषा करणे अजिबात शोभणारे नाही. जर हिंमत असेल तर सत्तेचे संरक्षण बाजूला ठेवून समोरासमोर या, आम्ही तुमचे स्वागतच करू. आम्ही गांधीवादी विचारांचे पाईक आहोत."

वडेट्टीवार यांनी पुढे बोलताना भूतकाळातील राजकीय उदाहरणांचा दाखला दिला. ते म्हणाले, "देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी विरोधकांकडून 'गुंगी गुडीया' म्हणून हिणवले गेले होते. परंतु, त्यांनी कधीही हार मानली नाही; उलट आपल्या राजकीय संघर्षातून आणि कर्तृत्वातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करून दाखवले. त्यानंतर देशाने त्यांचे कर्तृत्व मान्य केले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोरही आजही ती संधी आहे, त्यांनी संघर्षातून पुढे यावे आणि कामगिरी दाखवून द्यावी."

हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण: दरम्यान, या वादावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, हा कोणताच असंसदीय शब्द किंवा कोणतीही शिवी नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना महत्त्वाच्या प्रश्नांवर उत्तरे द्यावी लागतात. बीडमधील एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत एका लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची बोलती बंद केली, गप्प बसवले. अशा प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांनी हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवल्यामुळेच हा संदर्भ वापरण्यात आला होता.

तसेच, "उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महत्त्वाच्या विषयांवर अजिबात बोलत नाहीत. विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनाबाबत किंवा अर्थखातं काढून घेतल्यावर त्या काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. भाजपाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अधिकारांवर गदा आणली जात असतानाही त्या गप्प राहतात. सार्वजनिक पदावरील व्यक्तीचे अशा प्रकारे सातत्याने मौन बाळगणे अशोभनीय आहे," अशी टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलकत्ता रंगला असून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *