चंद्रपूर: काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली! वडेट्टीवार–धानोरकर संघर्षामुळे तीन स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीला स्थगिती

चंद्रपूर: काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे. महानगरपालिकेतील तीन स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती देण्या आली असून, या निर्णयामागे काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर गटांतील राजकीय संघर्ष कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे. या वादामुळे प्रकरण पुन्हा न्यायालयाच्या दारात पोहोचले आहे.

महानगरपालिकेतील तीन स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात काँग्रेसने नावे निश्चित केली होती. मात्र या निवडीवर पक्षातील दुसऱ्या गटाने आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयीन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियुक्त्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसमधील दोन प्रमुख गटांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे. महानगरपालिका आणि स्थानिक राजकारणातील महत्त्वाच्या पदांवर आपापल्या समर्थकांना संधी मिळावी, यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवरून मतभेद तीव्र झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे नियुक्ती प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संबंधित सदस्यांची नियुक्ती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणांवरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्वाने वेळेत हस्तक्षेप करून हा वाद मिटवला नाही, तर त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बळावर होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *