बलराज संघई यांचा कॉलम:केवळ दिसणं नव्हे, तर असणं सौंदर्य; चारित्र्य हाच खरा माणसाचा दागिना

सौंदर्याची व्याख्या: सौंदर्य म्हटलं की केवळ बाहेरून दिसणारे रूप असा सर्वसामान्य समज आहे. डोळ्याला सुंदर दिसलं, आपल्या दृष्टीने आपल्याला पाहायला कोणीतरी आवडलं, आणि फक्त तितक्यावरून मनाला भावलं म्हणजेच सौंदर्य वाटतं. परंतु वास्तविक पाहता सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य रूप (External physical look ) नसून, मनाला आनंद देणारा एखादा गुण अथवा गुणांचा समूह होय. एका ठिकाणी म्हटले आहे, “ the quality or group of qualities in a person or thing that gives pleasure to the senses or the mind : loveliness ” नेमके काय सुंदर हे प्रत्येकाच्या दृष्टीने वेगळे,भावनिक असू शकते, ते त्यांच्या वर्तवणूक आणि व्यवहारातून प्रकट होत असते. सौंदर्याची सविस्तर व्याख्या : जे पाहिल्यावर, ऐकल्यावर किंवा अनुभल्यावर मनाला शांतता आणि प्रसन्नता मिळते, ते सुंदर. आंतरिक सौंदर्य : केवळ बाह्य रूपापेक्षा कर्तृत्वनिष्ठा,सहृदयता सर्वांशी सुसंवाद खरी सुंदरता आहे. व्यक्तीसापेक्षता : (Subjectivity): सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. कुणाला बाह्य सौंदर्य महत्त्वाचे वाटते, तर कुणाला स्वभावातील सौंदर्य. थोडक्यात, दिसणं म्हणजे सौंदर्य ही व्याख्या पूर्ण असली तरी, असणं (व्यक्तिमत्त्व) म्हणजे सौंदर्य ही व्याख्या परिपूर्ण वाटते. सौंदर्य म्हणजे: सौंदर्य असते तरी काय? तर मात्र सुंदर दिसणं ? कोणाला तरी पाहिलं छान दिसलं आणि आवडलं ? दिसणं म्हणजे सौंदर्य ही साधी सरळ व्याख्या. अनेकांना अभिप्रेत असलेल्या 'दिसणं म्हणजे सौंदर्य ' या व्याख्येला जोडूनच एक व्याख्या आणखी करावीशी वाटते ती म्हणजे , 'असणं म्हणजे सौंदर्य '.माणूस कसा दिसतो हे आपण थोडा वेळ बघू. परंतु तो आतून कसा आहे हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच दिसण्याबरोबरच असणं देखील महत्त्वाचं आहे. प्रेम व सौंदर्य : प्रेमाचा संबंध सौंदर्याशी जास्त आहे. व्यक्तिमत्व, सुशिक्षितपण, सभ्यता, सद्गुण न पाहता केवळ दिसण्यावर काहीजण भाळून सौंदर्य म्हणून जीव लावताना दिसतात. असा साधारण अभिप्राय असला तरी तो वरवरचा आहे. कोण कधी, कोणाला, कशामुळे आवडेल हे सांगता येत नाही. याचाच अर्थ असा की कोणाला कोणत्या व्यक्तीमधील कधी कोणता गुण, कला लक्षात येईल आणि आवडेल याचा नेम नाही आणि त्यावेळी मात्र ती व्यक्ती त्याला सुंदर दिसायला लागेल .कदाचित त्याच्याबद्दल प्रेमही होऊन जाईल. छान पण सुंदर नाही: सौंदर्याविषयीचं प्रत्येकाचं मत अगदी वेगळं असतं.दिसण्यामध्ये आणि सुंदर दिसण्यासाठी केलेल्या शृंगारिक प्रयत्नामध्ये कोणाला सौंदर्य जाणवतं.एखादी स्त्री नटून थटून हळुवारपणे अलगद अशा हालचाली करत आभूषणे परिधान करते.किंवा एखादा पुरुष विशिष्ट हेअर स्टाईल करून,एखादा चांगला वेश परिधान करतो, तेव्हां त्या स्त्रीकडे, पुरुषाकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहतो. पण त्यांच्याकडे पाहिल्यावर जर ते दुसऱ्याला कमी समजत असतील असे दिसून आले तर ते छान दिसून देखील सुंदर वाटणार नाहीत. तत्त्वज्ञानातील क्षेत्रात : तात्विक दृष्टीने विचार करता सौंदर्याच्या बाबतीत केवळ वैशिष्ट्यांना महत्त्व आहे. सौंदर्य म्हणजे वस्तूंचे असे वैशिष्ट्य, जे त्यांना पाहण्यास आनंददायी बनवते, अशा वस्तूंमध्ये निसर्गदृश्ये, सृष्टी सौंदर्य, पृथ्वीवरील जैविकता , नैसर्गिक आणि मानवनिर्मित कलाकृती इत्यादी यांचा समावेश होतो. सौंदर्य, कला आणि अभिरुची हे तत्त्वज्ञानातील अभ्यास क्षेत्रांपैकी एक असलेल्या सौंदर्यशास्त्राचे मुख्य विषय आहेत. सौंदर्याची अती सामान्य संकल्पना : वैचारिक विवेक दृष्टीने आपण असे म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीची सौंदर्याची स्वतःची एक संकल्पना असते,जी संस्कृती आणि परंपरा तसेच वैयक्तिक स्वभाव आणि संवेदनशीलता याद्वारे स्थापित होते.त्याच वेळी, कोणताही सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक निकष विचारात न घेता, अनेकांना, अनेक वेळा कुठलेही आंतरिक वैशिष्ट्य नसलेला एखादा आवडता चेहरादेखील अनेकदा सुंदर मानला जातो. ते कां आणि कशामुळे याचे त्यांच्याकडे उत्तर नसते.सुंदर आहे, वाटले आणि म्हणजे सुंदर आहेच. जीव जडला ही बाब या ठिकाणी महत्त्वाची ठरते आणि हृदय बुद्धीवर राज्य करते. चारित्र्य हेच खरे सौंदर्य : वास्तविक सौंदर्य हे बाहेरून डोळ्याला दिसणाऱ्या रूपापेक्षा मनाच्या शुद्धतेत, चारित्र्यात आणि चांगल्या वर्तनात असते. चेहऱ्यावरील ग्लॅमर हेच सौंदर्य नसून इतरांबद्दलच्या आदरात ते दिसून येते. खरे सौंदर्य डोळ्यांनी नाही, तर आतील नजरेने जाणवते. खऱ्या सौंदर्याचे काही प्रमुख लक्षणं पुढील प्रमाणे आहेत: उज्ज्वल चारित्र्य, मनाची पवित्रता, आणि सद्विचार, आत्मविश्वास व स्वाभिमान, स्वत: धैर्याने जगणे, इतरांना मदत करणे आणि संकटात धीर दाखवणे यात खरे सौंदर्य आहे. आपण कसे दिसलो यापेक्षा आपण किती सुंदर जगलो हेच खरे मूल्यांकन असते.थोडक्यात सांगायचे तर, इतरांच्या चांगल्यासाठी जो विचार आचार व्यक्तीच्या आतून उत्स्फूर्तपणे येतो आणि कृतीतून प्रकट होतो, तेच खरे सौंदर्य. (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *