रत्नागिरी: वारीला गेले अन् विठुरायाच्या चरणी विसावले! येरडवचे माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ सावंत यांचे पंढरपूरमध्ये निधन

रत्नागिरी: कोणत्याही वारकऱ्यासाठी पंढरपूरपेक्षा श्रेष्ठ काहीच नसते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वारीला जाणे आणि माऊलीचे दर्शन घेणे यापेक्षा दुसरा मोठा आनंदही नसतो. दरवर्षी माऊलीच्या दर्शनासाठी वारीला जाताना त्यांच्यामध्ये नवा उत्साह संचारतो. अशाच उत्साहात आणि माऊलीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरला गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील येरडव गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख जगन्नाथ बाळकृष्ण सावंत (वय ७२) यांच्या आयुष्याची वारी मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री पंढरपूर येथे कायमची संपली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना तातडीने पंढरपूर येथील उपविभागीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करणारे जगन्नाथ सावंत हे एक निष्ठावंत आणि श्रद्धाळू वारकरी म्हणून पंचक्रोशीत परिचित होते. भक्तीभावाने वारीची परंपरा जपतानाच यंदाच्या वारीदरम्यान पंढरपूर येथेच त्यांचे निधन झाल्याने, त्यांनी प्रत्यक्ष विठुरायाच्या चरणीच देह ठेवल्याची हळहळ आणि भावना येरडवसह संपूर्ण राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सावंत यांनी तळागाळात संघटनेची बांधणी करण्यासाठी आणि पक्षकार्य पुढे नेण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आमदार किरण सामंत यांचे विश्वासू व निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती. ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना त्यांनी येरडव गावाच्या विविध विकासकामांत नेहमी सक्रिय सहभाग घेतला आणि गावकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तत्परतेने काम केले. त्यांच्या अचानक जाण्याने गावावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *