पुणे: 'एफडीए'चे २ दिवसांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ९६ ठिकाणी छापे; १२ परवाने निलंबित, ५ आस्थापने बंद करण्याचे आदेश

पुणे: हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांमध्ये मिळणारे अन्न खरोखरच सुरक्षित आहे का, असा गंभीर प्रश्न अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांमुळे निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी निगडित हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दोन दिवसांत तब्बल ९६ अन्न आस्थापनांवर धडक छापे टाकले. या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १२ आस्थापनांचे परवाने आणि नोंदणी निलंबित करण्यात आली, तर विनापरवाना व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या पाच आस्थापनांना व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दोन दिवसांत तपासणी मोहीम; अस्वच्छता व नियमांच्या उल्लंघनाचा प्रकार उघड

शुक्रवार (दि. २०) आणि शनिवारी (दि. २१) मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, केटरर्स आणि ऑनलाइन डार्क स्टोअर्सची सखोल तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत काही व्यावसायिकांकडून होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या. त्यामध्ये कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ एकत्र ठेवणे, अन्नपदार्थ उघडे ठेवणे, स्वयंपाकघरात उघड्या कचराकुंड्या असणे, अपुरी जागा आणि अस्वच्छता यांचा समावेश आहे. काही ठिकाणी अन्न साठवणुकीसाठी आणि भांडी धुण्यासाठी एकच जागा वापरली जात असल्याचे आढळले.

स्वयंपाकघरातील धक्कादायक त्रुटी; प्रशासनाचा कडक इशारा

तपासणी पथकाला काही ठिकाणी तुटलेल्या फरशा, तेलकट भिंती, कीटक नियंत्रणाचा अभाव, खाद्यतेलाची गुणवत्ता तपासणी न करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणाच्या नोंदी नसल्याचेही दिसून आले. एका ठिकाणी कर्मचाऱ्याने खाद्यपदार्थाची पट्टी स्वतःच्या पॅन्टवर ठेवल्याचे आढळले, तर काही ठिकाणी नोंदणीकृत जागेऐवजी तळघरात स्वयंपाकघर सुरू असल्याचे स्पष्ट झाले. तसेच उघडे गटार आणि पिण्याच्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल नसल्याच्या त्रुटीही समोर आल्या आहेत.

सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न पुरवावे; अन्यथा यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा एफडीए प्रशासनाकडून देण्यात आला आहे. बाहेरचे अन्न खाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना स्वच्छता व सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे नियमित आणि अचानक तपासण्या सुरू राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *