मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना

मुंबई: जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे म्हणजेच मुंबई लोकलमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोकल प्रवासादरम्यान हाणामारी आणि जीवघेण्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असतानाच, आता अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. चालत्या लोकलमध्ये दोन प्रवाशांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात झाले, मात्र संतापजनक बाब म्हणजे या भांडणात फेकलेला चाकू त्या दोघांना न लागता एका तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या थेट छातीत घुसला. या हल्ल्यात संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला असून, रेल्वे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, विरारहून चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल अंधेरी स्थानकातून सुटल्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेत धारावी येथील रहिवासी असलेले सुरेश शर्मा (वय ५३) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर चाकू फेकून मारल्याप्रकरणी शिवा गायकवाड (वय २५) या तरुणाला वांद्रे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी जखमी सुरेश शर्मा हे आपल्या एका वैयक्तिक कामासाठी बोरिवलीला गेले होते. काम आटोपून ते विरार-चर्चगेट फास्ट लोकलने आपल्या घरी परतत होते.

प्रवासादरम्यान डब्यातील इतर दोन प्रवाशांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला आणि पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. भांडण विकोपाला जात असतानाच त्यातील एक प्रवासी (आरोपी शिवा गायकवाड) अंधेरी रेल्वे स्थानकात उतरला. मात्र, त्याच्या डोक्यात राग कायम होता. अंधेरी स्थानकातून लोकल सुटताच त्याने फलाटावरून धावत येऊन ज्या प्रवाशासोबत भांडण झाले होते, त्याच्या दिशेने आपल्याजवळील धारदार चाकू जोरात फेकून मारला. दुर्दैवाने, निशाणा चुकल्याने तो चाकू डब्यात प्रवास करणाऱ्या सुरेश शर्मा यांच्या थेट छातीत जाऊन घुसला.

छातीत चाकू घुसल्याने शर्मा यांना खोलवर जखम झाली आणि त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. डब्यातील सहप्रवाशांनी तात्काळ प्रसंगावधान राखत लोकलची आपत्कालीन साखळी ओढली. साखळी ओढल्यामुळे रविवारी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी ही विरार-चर्चगेट फास्ट लोकल वांद्रे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर थांबली. रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) जवानांनी गाडी का थांबली याची तपासणी सुरू केली असता, डब्यात सुरेश शर्मा रक्ताच्या थारोळ्यात आणि छातीला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमी सुरेश शर्मा यांच्यावर वांद्रे स्थानकावरच तात्काळ प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसरीकडे, पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत चाकू फेकणाऱ्या आरोपी शिवा गायकवाड याला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी वांद्रे रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे लोकल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *