ख्रिस्तोफर कॉल्डवेल यांचा कॉलम:अवघ्या 12 महिन्यांत ट्रम्प यांनी विजयाचे रूपांतर पराभवात केले

अवघ्या 12 महिन्यांपूर्वी ट्रम्प आपला महत्त्वाकांक्षी व लोकप्रिय अजेंडा लागू करण्यासाठी मजबूत स्थितीत दिसत होते. त्या वेळी ट्रम्प अशा देशाचे नेतृत्व करत होते, जिथे शांतता होती.अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती. पहिल्या कार्यकाळात व्यापार व इमिग्रेशन धोरणांच्या अंमलबजावणीत अडथळे आणणाऱ्या तथाकथित ‘डीप स्टेट’चे त्यांनी कंबरडे मोडले होते. त्यांनी ‘यूएसएड’ गुंडाळले होते. कारण, त्यांच्या मते, ते परदेशात डेमोक्रॅटिक पक्षाचा अजेंडा पुढे नेत होते. त्यांच्या न्याय विभागाने त्यांना विरोध करणाऱ्या नागरी-हक्क कार्यकर्त्यांना निष्प्रभ केले होते. एवढेच नाही तर, त्यांनी अमेरिकेतील सांस्कृतिक उच्चभ्रू वर्गात विशेषतः सिलिकॉन व्हॅलीतही आपले स्थान निर्माण केले होते. तिथे लोक नव्या ‘वाइब-शिफ्ट’ची चर्चा करू लागले होते. हे खरे आहे की या प्रक्रियेत ट्रम्प यांनी देशातील आपले विरोधक आणि परदेशातील आपले मित्र - या दोघांनाही नाराज केले होते. टेरिफबाबतच्या त्यांच्या अनपेक्षित घोषणांनी गुंतवणूकदारांना चकित केले होते. पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला जवळपास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही, त्यांचे प्रशासन अत्यंत लोकप्रिय नसले तरी, त्यांना सातत्याने पुरेसा जनमानसाचा पाठिंबा नक्कीच मिळत होता. ऑक्टोबर 2025 च्या शेवटच्या दिवसांपर्यंत काही जनमत चाचण्या अशा होत्या, ज्यात त्यांची पसंती सुमारे 50 टक्के दिसत होती. ट्रम्प यांनी हे सर्व गमावले! आपला अहंकार, अस्थिरता आणि मूर्खपणाच्या निर्णयांनी त्यांनी विजयाचे रूपांतर पराभवात केले. तसे पाहिले तर, ट्रम्प ज्या धोरणांच्या आधारावर निवडणूक लढले होते आणि जी धोरणे त्यांनी लागूही केली होती, ती आजही लोकप्रिय आहेत. उदा.सीमेवर सुरक्षा व्यवस्था कडक करणे. याच वर्षी वसंत ऋतूत घेतलेल्या एका जनमत चाचणीत असे दिसून आले की, सीमा-सुरक्षा कडक करणे हे आजही असे इमिग्रेशन धोरण आहे, ज्याला मतदारांचा पाठिंबा आहे. पण ट्रम्प यांनी तार्किकतेऐवजी दमदाटीला प्राधान्य दिले. ते स्वतःला सौदेबाजीचे निष्णात खेळाडू मानत राहिले. सुरुवातीला डीईआय (विविधता, समानता आणि समावेश) आणि ‘पॉलिटिकल करेक्टनेस’शी संबंधित मुद्द्यांवरही ट्रम्प यांना पुरेसा जनमानसाचा पाठिंबा मिळाला होता. न्याय विभागाच्या धोरणांमध्ये बदल केल्यानंतर ते आपली मोहीम स्वाभाविकपणे पुढे जाऊ देऊ शकले असते. जेणेकरून लोक हळूहळू अशा अमेरिकेला सरावले असते, जिथे आरक्षण, स्पीच-कोड आणि लैंगिकतेच्या नवीन मान्यता जबरदस्तीने लागू करण्याची व्यवस्था नसेल. पण ट्रम्प यांनी विद्यापीठ परिसरांत आपली स्वतःची आचारसंहिता लादण्याचा प्रयत्न केला. परिणामी, अशी व्यवस्था अस्तित्वात आली, जी आधीच्या काळातील निर्बंध लादणाऱ्या व्यवस्थेसारखी होती. अशा स्थितीतच ‘वोक’ राजकारण आपल्या उत्कर्षाकडे वाढते. आणि परराष्ट्र धोरणाबद्दल तर बोलायलाच नको! हे खरे आहे की ग्रीनलँड हा खरोखरच एक महत्त्वाचा सामरिक प्रदेश आहे, ज्यावर अमेरिकाविरोधी शक्ती आपला प्रभाव टाकू शकतात. चीनच्या तुलनेत रशियाबद्दल डेमोक्रॅट्सनी अधिक चिंता करणे हे खरोखरच मूर्खपणाचे होते, हेही खरे आहे. पण पुन्हा एकदा, आपल्या वाटाघाटी करणाऱ्यांचा अपमान करण्याच्या हट्टापायी ट्रम्प यांनी तिथेही समस्या निर्माण केल्या, जिथे आधी कोणतीही समस्या नव्हती. कॅनडाचे कंझर्व्हेटिव्ह नेते पियरे पोइलिव्हरे हे पंतप्रधान बनण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात होती. पण तेव्हाच ट्रम्प यांनी कॅनडाला अमेरिकेचे 51 वे राज्य बनवण्यासारख्या मूर्खपणाच्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की मार्क कार्नी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला, जे ट्रम्प यांच्या सर्वात कट्टर विरोधकांपैकी एक आहेत. जून 2025 मध्ये, इस्रायलसोबत इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने बॉम्बफेक मोहिमेत सहभागी होण्यापूर्वी ट्रम्प यांची लोकप्रियता ज्या पातळीवर होती, ती त्यानंतर कधीही परत आली नाही. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ने ट्रम्प प्रशासनाच्या प्रत्येक भागाला आपल्या विळख्यात घेतले आणि त्यांची विश्वासार्हता नष्ट केली. यामुळे अमेरिकेचा केवळ लष्करीच नव्हे, तर राजनैतिक आघाडीवरही अपमान झाला. यामुळे अमेरिका-इस्रायल आघाडीही कमकुवत झाली. या युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत मोठी वाढ झाली. त्यामुळे महागाईचे सर्वात मोठे ओझे ट्रम्प यांच्या स्वतःच्या समर्थकांनाच उचलावे लागले. (द न्यूयॉर्क टाइम्समधून) ट्रम्प यांच्या अहंकाराने त्यांचा दुसरा कार्यकाळ उद्ध्वस्त केला. 2018 च्या मिड-टर्म निवडणुकांत त्यांना जो धक्का बसला होता, त्या तुलनेत यंदाचा पराभव अधिक निर्णायक वाटतो. कारण या वेळी त्यांना आपला अहंकार उघडपणे दाखवण्याची मोकळीक मिळाली होती.


शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *