पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!

पुणे: पुण्यातील गाजलेल्या पायल झांबरे मृत्यू प्रकरणात आता संताप अधिकच तीव्र झाला असून, दोषींना कठोर शिक्षा म्हणून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मृत पायलच्या नातेवाईक आणि नागरिकांनी पुणे न्यायालयाबाहेर जोरदार निदर्शने व आंदोलन केले आहे. हुडबळी, मानसिक व शारीरिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी आधीच पतीला अटक केली असून, त्यानंतर आता सासू आणि सासऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

हुंडाबळी आणि सततच्या छळाचे गंभीर आरोप

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार आणि माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल झांबरे यांचा विवाह १३ मार्च २०१९ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार अक्षय अरविंद झांबरे याच्यासोबत झाला होता. या विवाह सोहळ्यात माहेरच्या मंडळींनी ५० तोळे सोने, २५ लाख रुपयांची रोकड असा एकूण ७० ते ८० लाख रुपयांचा मोठा खर्च केला होता. मात्र, एवढे सगळे देऊनही सासरच्या मंडळींचे समाधान झाले नाही. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून पायलचा छळ सुरू झाला.

प्रत्येक सणाला माहेरहून सोने किंवा पैसे आणण्यासाठी सासू मंगल झांबरे आणि पती अक्षय यांच्याकडून सतत दबाव टाकला जात होता. यंदाच्या दिवाळीतही पाच ते दहा तोळे सोन्याची मागणी केली जात असल्याचे पायलने आपल्या भावाला सांगितले होते. याशिवाय, पायल उच्चशिक्षित असून त्यांनी एमएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले होते आणि त्या एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होत्या. आयटी क्षेत्रात काम करत असताना त्यांना प्रमोशन मिळण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु सासरच्या मंडळींकडून त्यांच्यावर नोकरी सोडून घराकडे लक्ष देण्यासाठी सतत मानसिक दबाव टाकला जात होता. करिअरमध्ये अडथळे आणल्यामुळे आणि सततच्या त्रासामुळे त्या अत्यंत हतबल झाल्या होत्या.

आत्महत्येपूर्वीचा शेवटचा संदेश आणि पोलिसांची कारवाई

घटनेच्या दिवशी पायल माहेरहून सासरी परतल्यानंतर, रात्री ९ वाजून १८ मिनिटांनी त्यांनी आपला भाऊ ऋषीकेश याला मोबाईलवर एक टेक्स्ट मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे "माझी सासू जबाबदार आहे" असे लिहिले होते. त्यानंतर त्यांचा मुकुंदनगर येथील एका फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सुरुवातीला पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला ताब्यात घेतले होते, आणि तपासाचा फास आवळत आता सासू मंगला झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांनाही अटक केली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत नातेवाईकांनी व महिला संघटनांनी पुणे न्यायालयाबाहेर तीव्र रोष व्यक्त केला आहे. स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *