हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी

हिंगोली: घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडली आहे. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये हवा असलेला आरोपी राजू मोहन शिंदे हा हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळशी येथे असल्याची माहिती लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांच्यासह एक सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि चार कर्मचारी असे सहा जणांचे पथक २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पळशी या गावात दाखल झाले.

आरोपी राजू शिंदे याला पकडण्यासाठी पथकातील कर्मचारी त्याच्या घरासमोर गेले असता, आरोपींनी हातात काठ्या व लोखंडी रॉड घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या डोक्यात मारहाण झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, सोबतच्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आरोपींनी मिरचीपूड टाकली आणि शासकीय वाहनावर दगडफेक करून वाहनाचे नुकसान केले.


प्राथमिक उपचार व तपास
या घटनेमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्यासह इतर कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी कर्मचाऱ्यांवर हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे आणि हट्टा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमर सुरेश केंद्रे यांनी हट्टा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून आरोपी विकी मोहन शिंदे, सुदर्शन मोहन शिंदे, सचिन मोहन शिंदे, राजू मोहन शिंदे व इतर तीन ते चार महिला-पुरुषांविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय केंद्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

दोन पथकांची स्थापना
या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांनी दोन पथकांची स्थापना केली असून, ही पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

 



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *