रायगड: महायुतीत मोठा वाद पेटला! खासदार सुनील तटकरेंनी आपल्याला संपवण्याची सुपारी दिल्याचा शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा सनसनाटी आरोप

रायगड: जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा तीव्र झाले असून, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. सुनील तटकरे हे अतिशय विश्वासघातकी नेते असून ते कायम केसाने गळा कापण्याचे काम करतात, असा घणाघात आमदार थोरवे यांनी केला. एवढेच नव्हे तर, आपल्याला जिवे मारण्यासाठी सुपारी देण्यात आली असून सुनील तटकरे आपल्याला संपवण्याचा कुटिल डाव रचत आहेत, असा गंभीर दावाही त्यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले की, आम्ही राजकीय मतभेद बाजूला सारून महायुतीच्या आदेशानुसार काम केले आणि विधानपरिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना मदत केली. मात्र, असे असतानाही सुनील तटकरे जिल्ह्यात सातत्याने शिवसेनेच्या विरोधात जाऊन आमच्या मतदारसंघात आणि अधिकारात हस्तक्षेप करत आहेत. आम्ही तटकरेंच्या मुलाला पाठिंबा देऊन खूप मोठी चूक केली, अशी भावना आता निर्माण झाली आहे. जर त्यावेळी मी आणि इतर नेत्यांनी वेगळा निर्णय घेतला असता, तर तटकरेंचा मुलगा आमदारच झाला नसता, असा दावा त्यांनी केला. तसेच, आपल्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी आपण मरणाला घाबरत नाही, आणि जर कोणी आमच्या विरोधात असे कुटिल डाव खेळणार असेल तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा जाहीर इशाराही थोरवे यांनी दिला आहे. या सर्व प्रकारची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार महेंद्र थोरवे यांच्या या विधानामुळे रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महायुतीमधील मित्रपक्षांमधील संघर्ष विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या आरोपांवर तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेत थोरवे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. खासदार सुनील तटकरे हे गेल्या ४५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात स्वच्छ प्रतिमेने वावरत असून त्यांच्यावर आजवर एकही साधा गुन्हा किंवा एनसी (NC) सुद्धा नोंदवलेली नाही. ते अत्यंत संयमी नेते आहेत, असे सांगत घारे यांनी थोरवेंनी केलेले आरोप अत्यंत दुर्दैवी आणि निराधार असल्याचे म्हटले. तसेच, आमदार थोरवे यांना त्यांच्याच कर्मामुळे झोप लागत नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात फिरण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. या परस्परविरोधी आरोप-प्रत्यारोपांमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *