सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण

सिंधुदुर्ग: कणकवली तालुक्यातील फोंडाघाट फोंडेकरवाडी येथे डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केल्याने सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (वय ५२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी, (दि.२७) रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे फोंडाघाट परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विष्णू यशवंत तळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत फोंडेकर आणि विष्णू तळेकर हे दोघेही दारू पिण्यासाठी एकत्र बसत असत. रविवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास भिकाजी फोंडेकर हे त्यांचे काका सूर्यकांत यांच्या घरी गेले होते. त्यावेळी सूर्यकांत हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसून आले. त्यावेळी विष्णू तळेकर हा घटनास्थळी बसलेला होता.

भिकाजी यांनी सूर्यकांत यांना काय झाले ? अशी विचारणा विष्णू तळेकर याच्याकडे केली असता, सूर्यकांत यांनी शिवीगाळ केल्याने आपण त्यांना मारहाण केल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सूर्यकांत यांना विचारले असता त्यांनीही विष्णू तळेकर याने आपल्याला मारल्याचे सांगितल्याचे पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद आहे.

यानंतर भिकाजी यांनी आरडाओरड करून स्थानिकांना जमा केले आणि सूर्यकांत यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून कणकवली येथे हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भिकाजी फोंडेकर यांच्या फिर्यादीनुसार विष्णू यशवंत तळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), ३५२ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास कणकवली पोलिस करीत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *