राजकुमार जैन यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎एकमेकांपेक्षा वेगळा विचार हीच आपली ताकद, विचारवैविध्याला ‘एआय’चा धोका‎

आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे आपल्या विचारांमधील‎विविधता होय. इतिहास साक्षीदार आहे की, प्रत्येक मोठ्या‎शोधामागे अशा एखाद्या व्यक्तीचा आवाज असतो, ज्याने‎आपल्या काळातील प्रस्थापित मान्यतांवर प्रश्न विचारण्याचे‎धाडस दाखवले. पण, ‘एआय’च्या युगात आपल्यासमोर‎एक प्रश्न उभा राहिला आहे. हे तंत्रज्ञान आपल्या ज्ञानातील‎विविधता तर संपवत नाहीये ना?‎ आज आपण काय वाचतो, काय शोधतो, कोणत्या‎विचारांपर्यंत पोहोचतो आणि कशा प्रकारची उत्तरे‎स्वीकारतो, या सर्वांवर अल्गोरिदमचा प्रभाव आहे. दुर्दैव‎असे की, ज्या डिजिटल जगाला एकेकाळी मानवी अनुभव,‎भाषा, संस्कृती आणि विचारांचा अथांग महासागर मानले‎जायचे, तेच जग आता हळूहळू मशिन्सनी तयार केलेल्या‎साहित्याने भरत चालले आहे. डिजिटल जग आता मूळ‎जाणिवांवर नव्हे, तर अल्गोरिदमवर आधारित प्रणालींद्वारे‎चालवले जात आहे. आपण अशी एक ज्ञान-प्रणाली तयार‎करत आहोत, जी स्वतःचाच पाया पोखरत आहे.‎ ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ ज्या मोठ्या प्रमाणावरील डेटावर‎प्रशिक्षित होतात, ते डिजिटल जगही आता त्यांनीच आधी‎तयार केलेल्या कृत्रिम आशयाने भरत चालले आहे.‎संशोधक या आत्मघातकी चक्राला ‘मॉडेल ऑटोफॅगी’‎असे नाव देतात. या अवस्थेत एखादी प्रणाली स्वतःच्याच‎डेटाचा उपभोग घेऊ लागते. यामुळे ज्ञानातील विविधता‎आणि मूळ आशय हळूहळू कमी होत जातो.‎ निसर्गातील जैवविविधता संपल्यावर जशी परिसंस्था‎कमकुवत होते, एखादे जंगल मजबूत असते, कारण त्यात‎अनेक प्रकारची जैवविविधता असते. पण जर ते एकाच‎प्रकारच्या झाडांवर अवलंबून राहिले, तर एखादा रोग संपूर्ण‎परिसंस्था नष्ट करू शकतो. ज्ञानाच्या जगाचेही तसेच आहे.‎ जेव्हा भविष्यातील मॉडेल्स हे मशिन्सनी तयार केलेल्या‎डेटावर वारंवार पुनरावृत्ती करतात, तेव्हा ज्ञानाचा मूळ‎जिवंतपणा, भाषेतील ओलावा आणि सूक्ष्मता नष्ट होऊ‎लागते. दीर्घकाळात यामुळे ‘मॉडेल कोलॅप्स’ म्हणजेच‎बौद्धिक ऱ्हास होतो. यात मशीनच्या प्रतिक्रिया अत्यंत‎कोरड्या, सर्जनशीलता नसलेल्या आणि सदोष बनतात.‎‘एआय’ प्रणाली स्वतःच तयार केलेल्या मापदंडांमधून‎शिकत असताना खऱ्या जगातील गुंतागुंत गमावून बसते.‎ इतिहासात अनेकदा अशा विचारांना सुरुवातीला‎नाकारण्यात आले, ज्यांनी नंतर जग बदलून टाकले.‎पोटातील अल्सरबद्दल दीर्घकाळ असे मानले जात होते की,‎जीवनशैली आणि तणाव हेच त्याचे कारण आहे. पण,‎हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा बॅक्टेरिया हे त्याचे मोठे‎कारण असू शकते, हे वैज्ञानिकांनी नंतर दाखवून दिले.‎सुरुवातीला या विचाराकडे संशयाने पाहिले गेले, पण अखेर‎याच शोधाला 2005 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित‎करण्यात आले. हेच विज्ञानाचे सौंदर्य आहे. ते असहमती‎आणि नव्या विचारांतूनच पुढे जाते.‎ 1840 च्या दशकातील आयर्लंडचा दुष्काळ ही केवळ एक‎नैसर्गिक आपत्ती नव्हती. संपूर्ण कृषी व्यवस्था एकाच‎ आनुवंशिक प्रजातीवर अवलंबून राहिली होती. त्यामुळे‎एका बुरशीजन्य संसर्गाने लाखो लोकांना उपासमारी आणि‎विस्थापनाच्या खाईत लोटले. ‘एआय’चे जगही अशाच‎डिजिटल मोनोकल्चरकडे वाटचाल करत आहे.‎ भविष्यातील माहिती-व्यवस्था केवळ त्याच विचारांना‎चालना देऊ लागली जे आधीपासूनच लोकप्रिय आहेत, तर‎नवीन आणि गैरसोयीचे प्रश्न हळूहळू गायब होऊ शकतात.‎सर्वात मोठा धोका चुकीच्या माहितीचा नाही, तर‎विचारांच्या एकरूपतेचा आहे. वेगळा विचार करण्याची‎क्षमता हीच आपली खरी ताकद आहे. ‘एआय’च्या युगात‎आपल्याला तीच ताकद जपून ठेवावी लागेल.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *