१८ दिवसांची दहशत संपली! चार जणांचा बळी घेणारी नरभक्षक वाघीण अखेर जेरबंद; मात्र काही तासांतच झाला मृत्यू!

अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालात चार जणांचे प्राण घेणाऱ्या एका कुख्यात आणि नरभक्षक वाघिणीला अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. मात्र, वाघिणीला बेशुद्ध करून उपचारासाठी व पुढील सुरक्षित हालचालीसाठी नागपूरच्या वन्यजीव रेस्क्यू सेंटरकडे नेत असताना वाटेतच तिचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे गेल्या १८ दिवसांपासून सुरू असलेला दहशतीचा थरार अखेर संपला असला, तरी वाघिणीच्या अचानक मृत्यूमुळे वन्यजीव वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कुठे आणि कसे घडले सत्र? मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या वाघिणीने गेल्या काही दिवसांत अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील विविध भागांत धुमाकूळ घातला होता. या वाघिणीच्या हल्ल्यात एकूण चार नागरिकांचा बळी गेला होता. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आष्टी-नर्सिंगपूर परिसरासह अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी आणि चांदूर बाजार तालुक्यांचा समावेश होता. अवघ्या २४ तासांच्या आत दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून एका तरुण युवतीसह शेतकऱ्याचा जीव घेतल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिकांच्या तीव्र रोषानांतर आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यानंतर वनविभागाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले.

अशी राबवली मोहिमेची अंमलबजावणी: वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभातर्फे रात्रंदिवस गस्त घालण्यात येत होती. यासाठी थर्मल ड्रोन कॅमेरे, ट्रॅप कॅमेरे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. अमरावती व वर्धा वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोला वनविभाग तसेच पुण्यातून आलेले विशेष पथक, स्थानिक पोलीस प्रशासन आणि वन्यजीव प्रेमींच्या मदतीने संयुक्त मोहीम राबवण्यात आली. अखेरीस ट्रँक्विलायझर गनचा (Tranquilizer Gun) अचूक वापर करून वाघिणीला यशस्वीरित्या बेशुद्ध करण्यात आले आणि जेरबंद करण्यात आले. परंतु, जेरबंद केल्यानंतर नागपूरच्या दिशेने हलवत असताना तिचा मृत्यू झाल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मागील १८ दिवसांपासून परिसरातील नागरिकांच्या जीवाला घोर लावणाऱ्या वाघिणीच्या प्रकरणाचा अखेर शेवट झाला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *