इन्स्टाग्रामवरील बनावट अकाऊंटचा सापळा अन् १७ वर्षीय हर्षद हुंदळेकरचा खून; प्रेमप्रकरणाच्या वादातून तिघे संशयित अटकेत

कोल्हापूर / चंदगड: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधाच्या रागातून १७ वर्षीय अल्पवयीन महाविद्यालयीन मुलाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील हर्षद प्रकाश हुंदळेकर (वय १७) असे खून झालेल्या मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह तिघा संशयितांना अटक केली असून, या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत हर्षद याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा कट रचण्यात आला होता. यातूनच मुख्य संशयित कीर्तीकुमार रामू कुट्रे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने एक भयंकर योजना आखली. सुमारे आठवडाभरापूर्वी इन्स्टाग्रामवर 'कमल खरात' या नावाने एक बनावट (फेक) अकाऊंट तयार करण्यात आले. या बनावट अकाऊंटवरून हर्षदशी चॅटिंग करून गोड बोलून त्याला शनिवारी रात्री पार्ले (ता. चंदगड) गावच्या हद्दीत भेटण्यासाठी बोलावण्यात आले.

ठरल्यानुसार हर्षद आपल्या अजय साळुंखे या मित्रासोबत त्या ठिकाणी पोहोचला. मात्र, संशयितांनी 'तू एकटाच भेटायला ये' असे सांगून अजयला वाटेतच थांबण्यास सांगितले आणि हर्षदला पुढे बोलावून घेतले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या संशयितांनी हर्षदवर डोक्यात प्राणघातक वार केले. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने हर्षदचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि गुन्हा लपवण्यासाठी संशयितांनी मृतदेह एका चारचाकी वाहनातून नेऊन तिलारी येथील 'स्वप्नवेल' पॉईंट जवळील खोल दरीत फेकून दिला. तसेच, मृत तरुणाची दुचाकी बेळगाव येथे नेऊन लांब फेकून दिली जेणेकरून पोलिसांचा समज तो दुसऱ्या दिशेने निघून गेल्याचा होईल.

दरम्यान, हर्षद घरी न परतल्याने त्याच्या आईने तो बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद पोलिसांत दिली. या तक्रारीच्या आधारे चंदगड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित कीर्तीकुमार रामू कुट्रे (वय २८), दिलीप ऊर्फ लहू लक्ष्मण कुट्रे (वय २९) आणि श्रीनाथ मधुकर नागुर्डेकर (वय २४) या तिघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, दरीत फेकलेल्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीम आणि पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *