उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला

उत्तर प्रदेश: कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळलेल्या माजी राष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर पत्नीवर पतीने सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती पतीचा छळ सहन करत होती. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडली. आपापसातील वाद मिटवण्याच्या आणि तडजोड करण्याच्या बहाण्याने पतीने पत्नीला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिथे तिच्यावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

खुशबू असे या पीडित महिला खेळाडूचे नाव असून त्या सध्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या प्राणघातक हल्ल्यातून खुशबू यांनी कशाबशा पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला आहे. या घटनेनंतर खुशबू यांनी पती वीरेंद्रविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पतीच्या अमानुष मारहाणीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

२०११ मध्ये लग्न; घरजावई बनून राहिला अन् सुरू झाला छळ
पीडित खुशबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा विवाह २०११ मध्ये वीरेंद्र याच्यासोबत झाला होता.
लग्नानंतर काही दिवसांतच वीरेंद्र हा खुशबू यांच्या पालकांच्या घरी राहू लागला. त्याने कोणतेही काम किंवा नोकरी केली नाही. त्याऐवजी तो सतत खुशबू यांच्यावर पैशांसाठी दबाव आणत होता आणि त्यांना बेदम मारहाण करायचा. दोन मुलांची आई असलेल्या खुशबू यांनी आपल्या संसारासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी पतीचा हा अत्याचार वर्षानुवर्षे सहन केला.


एटीएम कार्ड अन् आर्थिक छळ
अडीच वर्षांपूर्वी पती-पत्नीमधील तणाव अधिकच वाढला. वीरेंद्रने कोणतेही काम न करता खुशबू यांच्या कमाईवर डोळा ठेवण्यास सुरुवात केली. त्याने खुशबू यांचे एटीएम कार्ड, बँक खाती आणि आर्थिक व्यवहार पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले. अखेर सहा महिन्यांपूर्वी एका मोठ्या वादानंतर वीरेंद्र घर सोडून वेगळा राहू लागला होता.

हॉटेलमध्ये बोलावून सुऱ्याने प्राणघातक हल्ला
२६ जुलै रोजी वीरेंद्र याने खुशबू यांच्याशी संपर्क साधला आणि आपापसातील वाद संपवून तडजोड करण्यासाठी एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. पतीवर विश्वास ठेवून खुशबू तिथे पोहोचल्या असता, वीरेंद्रने त्यांच्याकडे थेट १ लाख रुपयांची मागणी केली. खुशबू यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतप्त झालेल्या वीरेंद्रने त्याच्याजवळील चाकू काढून त्यांच्यावर हल्ला केला.


वीरेंद्रने त्यांच्या पोटात सुरा खुपसण्याचा प्रयत्न केला, पण खुशबू वेळीच बाजूला झाल्याने तो वार त्यांच्या पायावर बसला. जखमी झालेल्या खुशबू यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यावर वीरेंद्रने त्यांच्या तोंडात कापड कोंबले आणि पुन्हा मारहाण सुरू केली. या सगळ्या भयानक प्रकारातून खुशबू यांनी कसाबसा स्वतःला वाचवत हॉटेलमधून पळ काढला आणि पोलिसांत धाव घेतली.

 



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *