नाशिक: त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने भाविकांसाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव; सिंहस्थाच्या विकासकामांवर नागरिकांचा तीव्र संताप!

नाशिक: जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन महिने, म्हणजेच १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि भाविकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून राजकीय वर्तुळातही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ठेकेदारांच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्यास आगामी दसरा, दिवाळी आणि ऐतिहासिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या रथोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणांना भाविकांना मुकावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

गुरुवारी राज्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर येथे प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी देवस्थान ट्रस्ट कार्यालयाच्या इमारतीत झालेल्या बैठकीमध्ये प्रशासकीय उच्च अधिकारी आणि मंदिर ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित होते. सिंहस्थ कामांतर्गत सुरू असलेल्या दर्शनपथाच्या आणि मंदिर प्रांगणातील कामांना गती देण्यासाठी मंदिर १५ ऑक्टोबरपासून पुढील दोन महिने पूर्णपणे बंद ठेवावे, अशी आक्रमक मागणी संबंधित ठेकेदारांनी केली आहे. विशेष दर्शनपथाचे काम करणाऱ्या महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ या यंत्रणेने मागील सहा महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी रस्ते आणि परिसर खोदून ठेवला आहे. एवढेच नव्हे तर सर्व शासकीय कार्यालये आणि उपजिल्हा रुग्णालय अन्यत्र स्थलांतरित करण्यात आले आहेत, परंतु प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

या सर्व प्रकारामुळे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात असून, प्राचीन मंदिराच्या वास्तूलाही धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंदिर प्रांगणात पुरातत्त्व विभाग मनमानी पद्धतीने काम करत असल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप आहे. याआधी २१ फेब्रुवारी २०१५ रोजी मागील सिंहस्थाचे पूर्वेनियाजन करताना, पुढील सिंहस्थाची तयारी तातडीने सुरू केली जाईल अशी मोठी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आजची वस्तुस्थिती पाहता प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शासकीय कार्यालये आणि दवाखाने स्थलांतरित केल्यामुळे लोकांची ये-जा बंद झाली असून स्थानिक बाजारपेठ आधीच मंदावली आहे. अशातच आता जर मंदिर दोन महिने बंद ठेवले, तर सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होऊन त्र्यंबकनगरीतील बेरोजगारीत मोठी वाढ होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

कुशावर्त घाटाचे काम गेल्या एक वर्षापासून रखडलेले आहे. सिंहस्थाचे ध्वजारोहण जवळ आल्याने घाईघाईने काम पूर्ण करण्यासाठी आता थेट पितृपक्षातच कुशावर्त घाट बंद ठेवण्यात आला आहे. त्र्यंबक शहरात सर्वत्र सुरू असलेल्या तोडफोडीमुळे छोटे व्यावसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. हातगाड्यांवर, छोट्या टेबलवर किंवा साध्या पाटीवर आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. अशा बिकट परिस्थितीत जर मंदिरच दोन महिने बंद ठेवले, तर जगायचे कसे आणि व्यवसाय कसा चालवायचा, असा मोठा प्रश्न त्र्यंबकच्या सर्वसामान्यांसमोर उभा ठाकला आहे. या निर्णयामुळे केवळ स्थानिकांचे आर्थिक नुकसान होईल असे नाही, तर मंदिराचे देखील अंदाजे १५ कोटी रुपयांचे मोठे उत्पन्न बुडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर फेरविचार करून योग्य ते नियोजन करावे, अशी जोरदार मागणी आता त्र्यंबकवासीयांकडून केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *