पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!

पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत ओतूर रोडवरील पेट्रोल पंपाशेजारी अर्धवट कापलेली लिंबे आणि काही अज्ञात व्यक्तींच्या छायाचित्रांचे तुकडे आढळून आले. बुधवारी (दि. १४) हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

घटनास्थळी कापलेली लिंबे, व्यक्तींच्या छायाचित्रांचे तुकडे आणि अन्य साहित्य आढळले. हे साहित्य कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकारामागील नेमके कारण अस्पष्ट आहे.

लिंबू कापणे किंवा छायाचित्रांचे तुकडे करून ठेवणे यामुळे एखाद्या व्यक्तीचे नुकसान होते, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. मात्र, अशा कृतींमुळे नागरिकांमध्ये भीती आणि गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अशा घटनांकडे विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे.
शिक्षणाचा प्रसार होत असतानाही अंधश्रद्धेशी संबंधित अशा घटना समोर येणे चिंतेची बाब मानली जात आहे. नागरिकांनी अफवा पसरविणे टाळावे आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन सुजाण नागरिकांकडून करण्यात येत आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *