अमरावती: दुष्काळदाह; लेकराप्रमाणे जपलेल्या संत्राची फळ तोडून फेकली! करोडोंचा फटका, झाडाला पाणी, अन्नरस पुरण्यासाठी शेतकऱ्यांची घालमेल

अमरावती: दुष्काळदाहात भर हिवाळ्यात विहिरी, बोअरला कोरड लागल्याने संत्रा कसा जगवावा, हा उत्पादकांसमोर प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बागेतील संत्राची उभी झाडे जगावी, यासाठी काही शेतकरी लेकराप्रमाणे जपलेल्या झाडांवरील मृग बहराची संत्री तोडून टाकत आहे. जेणेकरून झाडाला पाणी आणि पुरेसा अन्नरस मिळावा, यासाठी हा पर्याय अवलंबत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

जिल्ह्यात यावेळी सरासरी ४४ टक्के पावसाची तूट राहिली आहे. आठ तालुक्यात तर हे प्रमाण ५० टक्क्यांच्या दरम्यान आहे. त्यातच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंडामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेच नाही, त्यामुळे ही स्थिती ओढावली आहे. भूजल पातळीत झपाट्याने तूट येत असल्याने तास-दोन तासावर विहिरीतील मोटर चालत नाही, अशा परिस्थितीत काही बगिचे तहानल्याने सुकायला लागल्याने शेतकऱ्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या गळीनंतर थोडीफार राहिलेल्या आंबिया बहराच्या फळांची सध्या विक्री होत आहे. तर झाडांवर लिंबूच्या आकारात असलेल्या मृग बहराची फळे मार्चमध्ये विक्रीला तयार होतील, तोवर झाडे व फळे कशी टिकवावीत, हा प्रश्न उत्पादकांसमोर आहे. अशा परिस्थितीत झाडांवरील भार व काही फांद्या कमी केल्यास कमी पाण्यात झाड वाचविता येईल, या शक्यतेने अन्य उपाययोजनांसह शेतकरी मृग बहराची फळे तोडून टाकण्याचाही पर्याय अवलंबत आहे.

संत्रा लागवडीची जिल्हास्थिती (हेक्टर)

  • संत्रा लागवडीखालील क्षेत्र: ८४,५९८ हेक्टर

  • फळधारणाक्षम क्षेत्र: ७६,१३८ हेक्टर

  • आंबिया बहराचे क्षेत्र: ६४,७१७ हेक्टर

  • मृग बहराचे क्षेत्र: ११,४२० हेक्टर

दुष्काळस्थितीत फळगळीचा फटका

अपरा पाऊस व पावसाचा खंड या प्रतिकूल परिस्थितीत ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील ८० हजार हेक्टरवरील संत्राची गळ झाली. ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने हेक्टरी २२,५०० रुपयांप्रमाणे 'एनडीआरएफ'ची मदत अपेक्षित आहे. याबाबत २०३ कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे नोंदवली आहे. मात्र शासनस्तरावरून सध्या पाच हजारांचा अग्रीम मिळाला आहे.

फळतोडीचे नेमके कारण व शेतकऱ्यांची घालमेल

सध्या भूजल पातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नाही. कमी पाण्यात संत्राची पूर्ण वाढ झालेली झाडे आणि त्यावरील फळे तग धरणे कठीण झाले आहे. त्यामुळे झाडावरील फळांचा भार कमी करणे, गरजेनुसार काही फांद्यांची छाटणी करणे आणि उपलब्ध असलेले अल्प पाणी व अन्नरस केवळ झाडाचे अस्तित्व टिकवण्यासाठी वळवणे, हा कठोर निर्णय बागायतदारांना घ्यावा लागत आहे. लेकराप्रमाणे जपलेली फळे डोळ्यांदेखत तोडून टाकताना आणि बगिचे सुकताना पाहून शेतकऱ्यांचे मन हेलावून जात असून आर्थिक व मानसिक अशा दुहेरी संकटात संत्रा उत्पादक सापडले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *