दिवाळीत गावी जाणाऱ्या प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सकडून दुप्पट भाडेवसुली, आरटीओकडून कठोर कारवाईचा इशारा!

 

दिवाळीचा सण म्हटला की, चाकरमानी आणि नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्यासाठी गावाकडे जाण्याची लगबग सुरू करतात. महाराष्ट्रभरातून लाखो नागरिक यादरम्यान प्रवास करत असतात. एसटी महामंडळाच्या विशेष गाड्यांचे आरक्षण आधीच फुल्ल झाल्यामुळे अनेक नागरिक नाइिलाजाने खासगी ट्रॅव्हल्स आणि बसेसचा आधार घेतात. मात्र, नेमक्या याच गर्दीचा फायदा घेत काही खासगी बस चालकांकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. सामान्य दिवसांच्या तुलनेत दिवाळीच्या हंगामात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा आणि दुप्पट-तिप्पट भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

खासगी बस चालकांची मनमानी आणि प्रवाशांचा रोष:

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढताना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक मार्गांवरील खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे दर थेट दुप्पट किंवा तिप्पट करण्यात आले आहेत. काही मार्गांवरील बसचे भाडे जे साधारणपणे ७०० ते ९०० रुपये असते, ते वाढवून थेट ३,००० ते ७,००० रुपयांपर्यंत नेण्यात आल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या वाढीव दरामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे दिवाळीचे बजेट कोलमडले असून प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर आणि तिकीट बुकिंग ॲप्सचे स्क्रीनशॉट शेअर करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाची (RTO) आक्रमक भूमिका:

प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी आणि खासगी बस चालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. नियमानुसार, खासगी कंत्राटी बस चालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) संबंधित श्रेणीच्या बस भाड्याच्या दीडपटीपेक्षा (१.५ पट) अधिक भाडे आकारता येत नाही.

या नियमाचे उल्लंघन करून दुप्पट किंवा अतिरिक्त भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर आणि बस चालकांवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आरटीओची तपासणी पथके बसस्थानके, महामार्ग आणि चेकपॉइंटवर गाड्यांची तपासणी करत असून भाडेदर फलक, परवाने (Permits), आणि सुरक्षा उपकरणांची पडताळणी केली जात आहे. प्रवाशांनी देखील नाहक लूट होत असल्यास आपल्या तिकिटांसह आणि बसच्या तपशीलासह आरटीओकडे अधिकृत तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *