बलराज संघई यांचा कॉलम:फुलांची ओंजळ, थोडसं समाधान इतरांना देता येईल

सकाळीच आई स्नान करून हळदी कुंकवाचं घेऊन देवी आईच्या देवळात दर्शनाला जाण्यासाठी निघाली. जाताना ती फुलांची परडी घ्यायला विसरली नाही. ती परडी रिकामीच होती मात्र येताना भरणार होती. कॉलनीच्या कोपऱ्यावरच एक पारिजातकाचं झाड होतं. तिथं शुभ्र श्वेत केशरी अशा प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता. आईने ती फुलं गोळा केली. थोड्या थोड्या अंतरावर तिला जाई-जुई, मोगरा, चमेली अशीही फुलं मिळाली, ती आनंदाने वेचून परडीत घेतली. देवीआईच्या देवळात गेल्यावर हळदी कुंकू वाहून तिने काही फुलं देवी आईच्या चरणावर समर्पित केली. उरलेल्या काही फुलांची अर्धी पाऊण भरलेली परडी घेऊन ती घरी आली. घरी आल्यावर फुलांची ती परडी तिनं तिची सुनबाई अर्चनाच्या हाती दिली. घरच्या देवीआईला हळदीकुंकू वाहून दोघींनी काही फुलं देवीला चरणावर वाहिली. थोड्यावेळाने त्यांच्या घरी घरोबा असलेली श्रद्धा आली. श्रद्धा अत्यंत सुशिक्षित सुसंस्कारी. थोडेसे हितगुज, गप्पागोष्टी झाल्यावर ती आता जायला निघाली. काही फुले उरलेल्या त्या परडीकडे तिचं लक्ष गेलं अन् अर्चनाने नेमकं हेच हेरलं. ओंजळभर फुलं घेऊन अर्चनाने ती श्रद्धाच्या ओंजळीत टाकली. एका सात्विक आनंदाने आणि आपुलकीच्या नजरेनं श्रद्धा ने अर्चनाकडे पाहिलं. सात्विक आपुलकीचं संभाषण डोळ्यांच्या माध्यमातून घडलं.तिच्याही डोळ्यात सात्विक समाधान होतं. “ तुझ्या ओंजळीतली फुलं मी कधीच सुकू देणार नाही, तुझ्या प्रेमा इतकंच मला या फुलांना जपायचं आहे. माझ्या घरच्या देवीआईला समर्पित करून राहिलेल्या फुलांचा मी गजरा करून माझ्या केसात माळणार आहे. मात्र तुझी ही माझ्या आयुष्यात सुगंध पेरणारी फुलांची ओंजळ कधीच विसरणार नाही ” अर्चनाचे आभार मानत श्रद्धा तिच्या सोज्वळ चालीने परतली. एक मोलाचा संदेश देणारी ही हळुवार ललित कथा वाचताना मन हळवे होईल परंतु आपल्याला दररोजच्या व्यवहारात असे काही करता येईल का? याचा अवश्य विचार करावा. आपल्यामुळे कोणाच्या जीवनामध्ये काही अल्हाददायक क्षण येणार असतील तर आपला तितकाच वेळ सार्थकी लागला असे समजावे. जीवन जगत असताना आयुष्यामध्ये दुःख तर प्रत्येकाच्या वाट्याला आहेच. सुखाचे क्षण खूप कमी आणि अवघड जाणारा वेळ हा जास्तच असतो.अशावेळी देखील थोड्याशा कृतीने कोणाच्या जीवनामध्ये आनंदाचे सुगंधी शितल जल शिंपण होणार असेल त्या गोष्टीसाठी आवश्यक वेळ द्यावा. ईश्वराने माणसाला ज्या उद्देशासाठी बनवलं त्या उद्देशाकडे जाणं म्हणजेच अशा छोट्या छोट्या कृती. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *