सोलापूर: शंभर टक्के दृष्टी नसतानाही अंधत्वावर मात करत सुजित शिंदेंची क्लास वन शिक्षणाधिकारी पदाला ऐतिहासिक गवसणी

सोलापूर: अंधाराला छेदून प्रकाशाची नवी पहाट कशी फुलवायची, याचा एक अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी अध्याय साताऱ्याच्या सुजित शिंदे यांनी लिहिला आहे. शंभर टक्के अंधत्व पाठीशी असतानाही, नशिबाच्या रेषांपेक्षा स्वतःच्या कष्टांवर विश्वास ठेवत सुजित रमाकांत शिंदे महाराष्ट्राचे पहिले १०० टक्के अंध शिक्षणाधिकारी बनले आहेत. सोमवारी त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (योजना) पदाची सूत्रे स्वीकारली.

सुजित शिंदे यांचा जीवनप्रवास म्हणजे एक अश्रू आणि कष्टांनी भिजलेली कहाणी आहे. वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून रात्रंदिवस रस्त्यावर स्टेअरिंग फिरवून घराचा गाडा चालवत होते. वडिलांच्या हाताचे फोड आणि पाठीवरचा घाम पाहून लहानाचे मोठे झालेल्या सुजित यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. साताऱ्यातील 'सत्यशोधक अंधसयोग उपक्रम' या एनजीओजने त्यांच्या या संघर्षात विश्वासाचा हात दिला.

शिक्षण पूर्ण झाल्यावर सुजित शिंदे यांनी रेल्वेत ९ वर्षे आणि युनियन बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून ७वर्षे नोकरी केली. मात्र, मनात अधिकारी बनण्याची जिद्द कायम होती. २०२२ मध्ये एमपीएससीची जाहिरात आली आणि २०२५ मध्ये ते उत्तीर्ण झाले. एक वर्ष साताऱ्यात परिविक्षाधीन गटशिक्षणाधिकारी म्हणून सेवा दिल्यानंतर आता सोलापुरात ते रुजू झाले आहेत. सोमवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली.


आई अन् पत्नीच अभ्यासातील 'दृष्टी' अन् अनोखी लव्ह स्टोरी
एमपीएससीची तयारी करत असताना सुजित यांना आई आणि पत्नीची अभूतपूर्व साथ मिळाली. सुजित यांचा प्रेमविवाह झालेला असून, दृष्टी नसताना अभ्यासात आलेल्या अडचणींवर पत्नीने तोडगा काढला, पत्नी स्वतः तासन् तास पुस्तके वाचून दाखवायची आणि त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग करायची. हेच रेकॉर्डिंग रात्रंदिवस ऐकून सुजित यांनी स्पर्धा परीक्षेचा डोंगर पार केला.

पेपर वाचणारे मशीन देणार
सुजित शिंदे हे १०० टक्के अंध आहेत. शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना त्यांना जिल्हा परिषदेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल. कागद किंवा पेपर ठेवल्यानंतर तो वाचून दाखवणारे मशीन त्यांना देण्यात येणार आहे. याशिवाय काम करताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.


विजय मुळे यांनी घेतला पदभार
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर परिविक्षाधीन शिक्षणाधिकारी विजय मुळे हे सोमवारी रूजू झाले. कादर शेख यांची पुण्याला बदली झाली आहे.

"माझ्या डोळ्यांत प्रकाश नसला, तरी राज्यातील एकाही विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात राहू देणार नाही. प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि शासकीय योजना तळागाळातील मुलांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय असेल," असं सुजित शिंदे म्हणाले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *