पुणे: सोशल मीडियावरील मैत्री ठरली घातक; पुण्याच्या कोंढव्यात शिक्षिकेच्या घरून १४ लाखांचा ऐवज लांबवणारा मित्र अखेर गुजरातधून जेतीत

 

पुणे: कोंढवा परिसरात सोशल मीडियावरील मैत्रीचा गैरफायदा घेत एका नराधम मित्राने शिक्षिका असलेल्या तरुणीच्या घरातून तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पाहुणा म्हणून घरात आलेल्या या मित्राने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लांबवत पोबारा केला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोठी कारवाई करत पसार झालेल्या आरोपीला गुजरातमधील बडोदा येथून अटक केली असून, त्याच्याकडून चोरीतील जवळपास १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पेशाने शिक्षिका असून ती अविवाहित आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, जि. मेहसाणा, गुजरात) या तरुणाशी ओळख झाली होती. एमबीएचे शिक्षण घेतलेला आणि यापूर्वी केनियामध्ये नोकरी व एका टूरिस्ट कंपनीत काम करणारा यश हा २५ जून रोजी कोंढवा खुर्द येथील तरुणीच्या घरी तिला भेटण्यासाठी आला होता.

दरम्यान, तरुण घरी गप्पा मारत असतानाच ती तरुणी त्याच सोसायटीत राहणाऱ्या आपल्या मावशीकडे जेवणाचा डबा देण्यासाठी काही वेळ बाहेर गेली. घरात कोणीच नाही आणि मित्र एकटाच आहे, याच संधीचा पूर्ण गैरफायदा घेत यशने बेडरूममधील कपाट उघडून त्यातील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरला. त्यानंतर, "माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी निघतो," असे सांगत त्याने तेथून काढता पाय घेतला. काही वेळानंतर तरुणी घरी परतली असता तिला कपाट उघडे व साहित्य विस्कटलेले दिसले. घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

तांत्रिक विश्लेषणातून लागला माग, गुजरातमध्ये अटक:
याप्रकरणी पीडित तरुणीने तात्काळ कोंढवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपी हा केवळ स्नॅपचॅटच्या (Snapchat) माध्यमातून तरुणीच्या संपर्कात होता आणि त्याचा कोणताही मोबाईल क्रमांक पोलिसांकडे उपलब्ध नव्हता.

कोंढवा पोलिसांनी सायबर व तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे आरोपीचा माग काढला. यादरम्यान पोलीस कर्मचारी केशव हिरवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी बडोदा (गुजरात) येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पासपोर्टसंदर्भातील एका कामासाठी तो बडोदा येथे आला असताना, कोंढवा पोलिसांच्या पथकाने तिथे सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून १४ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने यशस्वीरीत्या जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *