पुणे:खाकीच्या नावाखाली १ कोटींच्या लूटचा प्रयत्न फसला, विश्वासातील कार चालकानेच मित्रांसह रचला होता भयानक कट, ३ जण जेरबंद

पुणे: सातारा महामार्गावर नवले पुलाजवळ बँकेत भरण्यासाठी चाललेल्या एका व्यावसायिकाच्या कारला अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्वतःच्याच खासगी कारच्या चालकाने संपत्तीच्या लोभापोटी साथीदारांच्या मदतीने हा दरोड्याचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, नऱ्हे पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?
तळेगाव दाभाडे येथील एक स्टेशनरी व्यावसायिक त्यांच्या व्यवसायातून आणि ट्रस्टच्या कामातून जमा झालेली तब्बल १ कोटी रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी जात होते. यासाठी त्यांनी नेहमीप्रमाणे ओळखीची एक खासगी कार भाड्याने घेतली होती. या कारचा चालक विक्रम चाकणकर हा त्यांच्या परिचयातील आणि विश्वासातील होता. व्यावसायिक आणि त्यांचे सहकारी नोटांनी भरलेल्या दोन बॅगा घेऊन कारमध्ये बसले.

मात्र, ठरलेल्या बँकेत जाण्याऐवजी चालक विक्रम चाकणकरने ती कार नवले पुलाजवळ आणली. तिथे आधीच दोन दुचाकींवरून आलेल्या संशयितांनी त्यांची कार अडवली. गाडीत बसलेल्या व्यक्तींना "आम्ही पोलीस आहोत, तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात हे आम्हाला माहीत आहे," अशी धमकी देत या भामट्यांनी खोट्या पोलिसांची बतावणी केली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे व्यावसायिक व त्यांचे सहकारी प्रचंड घाबरले.

पोलिसांच्या सतर्कतेने आणि चौकशीने फुटले बिंग
चोरट्यांनी बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि व्यावसायिकाच्या प्रसंगावधानामुळे हा डाव उघडकीस आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत कसून चौकशी केली. पोलिसांच्या खाकीचा इंगा दाखवताच कारचालक विक्रम चाकणकर आणि त्याच्या साथीदारांनी गुन्ह्याची कबुली दिली. संपत्तीच्या हव्यासापोटी चालकानेच आपल्या इतर साथीदारांना येऊन हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गणेश कदम, विक्रम चाकणकर आणि अमेया कराळे या तिघांना अटक केली असून, उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *