बीड: बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती

बीड: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या वादग्रस्त 'दावत-ए-इस्लामी' या संस्थेच्या संपर्कात असलेल्या आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी निगडित असलेल्या बीडमधील एका बनावट ट्रस्टचा प्रताप एटीएसने उघडकीस आणला आहे. धार्मिक कार्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव (जि. बीड) येथील पात्रुड येथे 'गुलजार-ए-रजा' या नावाचा एक बोगस ट्रस्ट तयार करण्यात आला होता. या ट्रस्टच्या माध्यमातून लोकांकडून धार्मिक कार्याच्या नावाखाली भरभक्कम देणग्या गोळा करण्यात आल्या. विशेष म्हणजे, लातूरच्या ॲक्सिस बँक शाखेत या बोगस ट्रस्टच्या नावाने ५ बँक खाती उघडून तब्बल ४ कोटी ७३ लाखांहून अधिक रकमेचे व्यवहार करण्यात आले. परंतु, तपासादरम्यान हा ट्रस्ट धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत नसल्याचे आणि त्याने दुसऱ्याच संस्थेचा नोंदणी क्रमांक वापरून बोगस कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी एटीएसने केलेल्या सखोल चौकशीत, या ट्रस्टला परदेशातील वादग्रस्त संस्थांकडून तसेच पाकिस्तानशी जोडलेल्या खात्यातून निधी मिळाल्याचा संशय बळावला आहे. हा गोळा करण्यात आलेला निधी देशविघातक कारवायांसाठी वापरला गेला असावा, या शक्यतेवरून दहशतवाद विरोधी पथक समांतर तपास करत असून, याप्रकरणी चार विश्वस्तांविरोधात गुन्हे दाखल करत काहींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *