शिर्डी: साईबाबा मंदिराच्या गेटसमोर रक्तरंजित थरार; महिलेवर चाकूने वार करत संपवले, दोन महिलांना अटक

शिर्डी: साईमंदिर परिसरात गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. साईबाबा मंदिराच्या महाद्वार क्रमांक ४ समोर, शेजआरतीपूर्वी भाविकांची मोठी गर्दी असताना एका फोटो विक्रेत्या तरुणीने कैरी-काकडी विक्री करणाऱ्या महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात २६ वर्षीय जयश्री क्षीरसागर ही महिला गंभीर जखमी झाली असून, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जयश्री क्षीरसागर ही नेहमीप्रमाणे आपल्या कैरी-काकडीच्या ठेल्यावर व्यवसाय करत होती. त्यावेळी हातावर फोटो विक्री करणारी फिजा नावाची तरुणी तेथे आली. काही कारणावरून त्यांच्यात वाद झाला, ज्याचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. हल्लेखोर महिलांनी जयश्रीवर चाकूने सपासप वार केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली आणि भाविकांमध्ये दहशत पसरली. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी झालेली जयश्री हिला साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शिर्डी पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपी महिलांना ताब्यात घेतले असून, या हल्ल्यामागील नेमके कारण काय आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास केला जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *