कोल्हापूर: WhatsApp स्टेटस ठेऊन पत्नीची निर्घृण हत्या! पेठवडगावातील भरदिवसाच्या घटनेने खळबळ .

कोल्हापूर: पेठवडगाव येथे भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अमृता कांबळे या महिलेची तिच्या पतीने भररस्त्यात कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडली. या हल्ल्यापूर्वी आरोपीने आपल्या WhatsApp स्टेटसवर "आज माझा तरी शेवट, तुझा तर शेवट" असा मजकूर ठेवल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयावरून सतत वाद होत होते. बुधवारी दुपारी अमृता या पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात असताना आरोपी तेथे पोहोचला. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने कोयत्याने सपासप वार केले. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, "ती माझी पत्नी आहे, तुम्ही मध्ये पडू नका," असे म्हणत त्याने त्यांना दूर सारले आणि घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या अमृता यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे पेठवडगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *