मुंबईकरांचा प्रवास झाला नकोसा! पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या छतामधून थेट पाणी गळती; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

मुंबई :मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणे सध्या मुंबईकरांसाठी एक मोठे दिव्य ठरत आहे. नुकताच बोरिवली ते विरार दरम्यान धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमधील डब्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनच्या डब्याच्या छतामधून मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळताना दिसत आहे.

रेल्वे प्रशासनाचे दावे फोल :

पावसाळा सुरू होण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाकडून लोकलच्या देखभालीसाठी आणि पावसाळ्यातील अडचणी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात लोकलच्या डब्यातून होणारी ही पाणी गळती पाहता, रेल्वे प्रशासनाचे हे सर्व दावे फोल असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रवाशांना या गळतीमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

प्रवाशांचे हाल :

डब्याच्या आत छतामधून पाणी थेट खाली येत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. लोकलमध्ये प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते, त्यातच ही पाणी गळती सुरू असल्याने प्रवाशांना उभे राहायलाही जागा शिल्लक राहत नाही. ही परिस्थिती रेल्वेच्या देखभालीच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करते. या प्रकारामुळे प्रवासी संताप व्यक्त करत असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे आणि लोकलच्या डब्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *