मुंबई: पावसाचा हाहाकार! साकीनाक्यात उघड्या मॅनहोलने घेतला निष्पाप जीव; अस्लम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे साकीनाका परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. खैरानी रोडवर रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम इस्साक शेख (वय ५५) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना: गुरुवारी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. अस्लम शेख हे खैरानी रोडवरून फोनवर बोलत चालले होते. मुसळधार पाऊस आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांना मॅनहोल उघडे असल्याचा अंदाज आला नाही. रस्त्यावर मॅनहोलचे झाकण काढलेले होते आणि सुरक्षेसाठी तिथे कोणतेही बॅरिकेड्स किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले नव्हते. परिणामी, अस्लम शेख थेट सुमारे २५ ते ३० फूट खोल मॅनहोलमध्ये कोसळले.

 

बचाव कार्य आणि मृत्यू: मॅनहोलमधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने ते वाहून गेले. स्थानिक नागरिकांनी आणि मॅनहोलजवळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ही घटना पाहिल्यानंतर तात्काळ महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक शोधमोहीम राबवून सुमारे ३ ते ४ तासांनंतर अस्लम शेख यांचा मृतदेह पुढील मॅनहोलमधून बाहेर काढला. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रशासनावर संताप:या प्रकरणी कंत्राटदार आणि संबंधित कामगारांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा सुरक्षेचे उपाय न करता मॅनहोल उघडे ठेवल्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, महापौर रितू तावडे यांनी मृताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, संबंधित चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *